मुंबई : सायबर फसवणुकीसाठी कुप्रसिध्द असलेल्या झारखंडमधील जमतारा जिल्ह्यातील तीन सायबर भामट्यांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या गुन्ह्यात आलेले पैसे बॅंकेतून काढण्यासाठी ते मुंबईत आले होते. त्यांच्याकडे बॅंकांची ५६ एटीएम कार्ड सापडली. आरोपींनी अनेकांची सायबर फसवणूक केल्याची कबुली दिली.
सायबर फसवणूक म्हटली की ‘जमतारा’ हे नाव डोळ्यासमोर येते. झारखंडमधील जमतारा जिल्ह्यातील बहुंताश मंडळी सायबर फसवणुकीत सक्रिय आहेत. ‘जमतारा’ नावाने एक बेवसिरीज आल्यानंतर हे नाव उजेडात आले. जमतारा जिल्ह्यात सर्वाधिक भामटे असून ते देशभरात विविध सायबर गुन्ह्यात सक्रिय आहेत. छत्तीसगढमधील बस्तर जिल्ह्यात फसवणुकीचा एक गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील रक्कम मुंबईतील बॅंक खात्यात वळती करण्यात आली होती. ती रक्कम काढण्यासाठी सायबर भामटे मुंबईत आल्याची माहिती कांदिवली पोलिसांच्या सायबर कक्षाला मिळाली होती.
त्यानुसार सायबर कक्षाने कांदिवली येथील एका हॉटेलामध्ये छापा टाकून तीन सायबर भामट्यांना अटक केली. मोहम्मद इमरान अन्सारी (३६), अलीउद्दीन सरफउद्दीन अन्सारी (३४) आणि राजकुमार मधुबन प्रसाद (३३) अशी या तीन आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून बॅंकांची ५६ एटीएम कार्ड, आठ मोबाइल आणि ९० हजार रुपये जप्त करण्यात आले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी अडाणे यांनी दिली.
फसवणुकीचे पैसे बनावट बॅंक खात्यात…
सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक करीत आहेत. फसवणुकीतून आलेले पैसे थेट आपल्या खात्याऐवजी दुसऱ्या बॅंक खात्यात वळते करतात. त्याला ‘थर्ड पार्टी अकाऊंट’ असे म्हटले जाते. काही व्यक्तींना कमिशन देण्याचे आमिष दाखवून त्यांची बॅंक खाती उघडली जातात, तर अनेकांच्या आधार कार्डाचे तपशील मिळवून त्या आधारे अशी बॅंक खाती उघडण्यात येतात. त्या बॅंक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येते.
फसवणुकीचे पैसे अशा खात्यात आले की सायबर भामटे ती रक्कम काढतात. लाडकी बहिण योजनेच्या नावाखाली मुंबईत अशाप्रकारे शेकडो बॅंक खाती उघडण्यात आली होती. दरम्यान, या आरोपींच्या चौकशीत अनेक सायबर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी अडाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हरीश गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कादबाने, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मगर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद गावकर आदींच्या पथकाने या भामट्यांना पकडण्यात यश मिळवले.