मुंबई : कांदिवली (पूर्व) येथील समतानगरमधील म्हाडा संकुलाच्या मध्यम उत्पन्न गटाच्या २२ इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम २०१७ पासून रखडले आहे. या कामाला आता गती मिळणार असून १ एप्रिल २०२६ पासून पुन्हा सुरू करण्यात येईल. या कामाच्या प्रगतीचा दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाईल. या कामात विलंब झाल्यास विकासकावर कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत सोमवारी केले..
कांदिवली (पूर्व) येथील समता नगरमधील २२ मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला. २०१७ मध्ये करार होऊनही अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला. या प्रश्नावरून भाजप गटनेते प्रवीण दरेकर, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, ठाकरे सेनेचे आमदार अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारला धारेवर धरले. विकासकाकडून राज्यमंत्री आणि म्हाडा अधिकाऱ्याच्या निर्णयाला केराची टोपली दाखवली जात असल्याने विकासकावर कारवाई करावी अशी मागणी सदस्यांनी केली. यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी समतानगर येथील प्रकल्पासंदर्भात गृहनिर्माण राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या प्रकल्पातील ३१८ निष्कासित सदनिकाधारकांपैकी ३१० जणांचे भाडे मार्च २०२६ पर्यंत देण्यात आले असून उर्वरित आठ जणांचे भाडे देण्याचे आदेशही देण्यात येतील तसेच दरवर्षीचे भाडे आगावू देण्याबाबत सूचित केले जाईल, असे आश्वासन दिले.
भाडेकरूंना देय असलेल्या भाड्याबाबत कोणतीही तक्रार राहू नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. अधिवेशन संपल्यानंतर सर्व संबंधित सदस्यांची या विषयी पुन्हा बैठक घेतली जाईल. या बैठकीस लोकप्रतिनिधी, म्हाडा अधिकारी तसेच गृहनिर्माण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, भाडेकरूंचे प्रतिनिधी यांनाही निमंत्रित केले जाईल असेही देसाई यांनी सांगितले.
