मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील रक्तपेढ्यांची तपासणी माेहीम हाती घेतली आहे. या मोहीमेंतर्गत काही दिवसांपूर्वी केईएम रुग्णालय आणि रेल्वेच्या जगजीवनदास रुग्णालयातील रक्तपेढ्यांवर कारवाई केल्यानंतर आता एफडीएने कांदिवली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील (शताब्दी) रक्तपेढीवर कारवाई केली आहे. या रक्तपेढीमध्ये आढळलेल्या विविध त्रुटींमुळे तीन दिवस रक्तपेढीचा परवाना निलंबित करण्याचे आदेश एफडीएकडून देण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील केईएम रुग्णालयाची रक्तपेढी आणि रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयातील रक्तपेढीवर कारवाई करून त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. त्यापाठोपाठ आता कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयातील रक्तपेढीची एफडीएकडून तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये रक्तपेढीमध्ये अपुरे मनुष्यबळ असल्याचे आढळून आले. रक्तपेढी चालविण्यासाठी आठ तंत्रज्ञ असणे आवश्यक असताना या रक्तपेढीमध्ये फक्त तीनच तंत्रज्ञ आहेत. रक्तपेढीमध्ये पाच अधिकारी असणे अपेक्षित असताना या रक्तपेढीमध्ये एकच पूर्णवेळ अधिकारी आणि एक डीएनबी विद्यार्थी कार्यरत असल्याचे आढळून आले. तसेच किट्स आणि नोंदवही अपूर्ण असल्याचे आढळून आल्याने रक्तपेढीचा परवाना ऑक्टोबरमध्ये तीन दिवस निलंबित करण्याचे आदेश एफडीएकडून देण्यात आले आहेत.
रक्तपेढी पीपीपी तत्त्वावर चालविण्याची प्रक्रिया सुरू एफडीएला आढळून आलेल्या त्रुटींबाबत रुग्णालय प्रशासनाने एफडीएकडे अपील केले आहे. या अपीलमध्ये रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुविधा आणि रक्तपेढी यंत्रसामुग्री याची सविस्तर माहिती एफडीएला देण्यात आली असल्याचे रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. कांदिवली शताब्दी रुग्णालयामध्ये सध्या पूर्ण रक्त रुग्णांना उपलब्ध करून दिले जाते. पण सध्या पीआरसीबी स्वरुपातील रक्ताची आवश्यकता असते. रुग्णालयातील रक्तपेढी ही पीपीपी तत्त्वावर चालविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास रुग्णांना तिन्ही पाळ्यांमध्ये आणि आवश्यक रक्तसाठा उपलब्ध होईल, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली.
रक्त पेढ्यांची तपासणी का?
रक्त हे मानवी जीवनासाठी अत्यंत अमूल्य, जीवनरक्षक व अत्यावश्यक औषधीय घटक आहे. गंभीर अपघात, शस्त्रक्रिया, प्रसूतीदरम्यान होणारा रक्तस्राव, थॅलेसेमिया, हिमोफिलिया, कर्करोग तसेच इतर गंभीर आजारांच्या उपचारांमध्ये सुरक्षित रक्त व रक्तघटकांची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे रक्तकेंद्र व रक्त साठवणूक केंद्रांचे कामकाज हे सार्वजनिक आरोग्याशी थेट संबंधित आहे. रक्त संकलन, रक्ताची तपासणी, रक्तघटकांचे विभाजन, साठवणूक, तापमान नियंत्रण, गुणवत्ता नियंत्रण, प्रशिक्षित मनुष्यबळ, उपकरणांची उपलब्धता, अभिलेखांचे व्यवस्थापन आणि जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन यांसह सर्व बाबींसाठी कठोर निकष निर्धारित करण्यात आले आहेत. या निकषांचे पालन होत आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी एफडीएकडून रक्तपेढ्यांचे आकस्मिक निरीक्षण करण्यात येते. त्यानुसार मुंबईतील विविध रुग्णालयांमधील रक्तपेढीची तपासणी करण्यात येत आहे.
