मुंबई : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या रिझर्व्ह बँकेकडील निपटारा खात्यातून १३ कोटी ९६ लाख रुपयांची रक्कम १८७ अनधिकृत व्यवहारांद्वारे वळविण्यात आल्याच्या सायबर अपहारप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी कांदिवलीतील कपड्यांच्या व्यापाऱ्याला अटक केली आहे. मेहुल सीमारिया (४९) असे अटक करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव असून, त्याच्या कंपनीच्या खात्यात अपहारातील सुमारे एक कोटी रुपये जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या रकमेतून त्याने आभासी चलन खरेदी केल्याचा पोलिसांना संशय असून, पैशांचा पुढील मागोवा घेण्यात येत आहे.
सीमारिया हा ‘दर्शन ड्रेसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीशी संबंधित आहे. या कंपनीच्या खासगी बँकेतील खार शाखेच्या खात्यात अपहारातील सुमारे एक कोटी रुपये जमा झाले होते. संबंधित व्यवहारांबाबत चौकशी केली असता सीमारिया समाधानकारक माहिती देऊ शकला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या रकमेतून आभासी चलन खरेदी करण्यात आले का, तसेच ती परदेशातील खात्यांमध्ये वळविण्यात आली आहे का, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात गोरेगाव येथील विष्णू राठी आणि कांदिवलीतील वरुणराज नरकर या आणखी दोघांचा शोध पोलिस घेत आहेत.
या व्यवहारांमध्ये बँकेच्या आर्थिक संदेशवहन प्रणालीशी संबंधित सर्व्हरमध्ये अनधिकृत प्रवेश करण्यात आल्याचा संशय आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची पूर्ण मालकी असलेल्या इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाईड सर्व्हिसेस (आयएफटीएएस) या संस्थेच्या केंद्रीय एसएफएमएस सर्व्हरपर्यंत बँकेच्या प्रणालीमार्फत अनधिकृत प्रवेश मिळवून व्यवहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. एसएफएमएस ही बँकांदरम्यान आर्थिक व्यवहारांचे संदेश पाठविण्यासाठी वापरली जाणारी प्रणाली आहे. या प्रणालीतील कथित गैरवापरामुळे बँकेच्या निपटारा खात्यातून रक्कम वळविण्यात आल्याचा तपास यंत्रणांचा संशय आहे. विशेष म्हणजे, बँकेच्या अंतर्गत नोंदींमध्ये या १८७ व्यवहारांचा तपशील आढळला नव्हता.
व्यवहारांचा तपशील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीनुसार, १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान बँकेच्या रिझर्व्ह बँकेकडील निपटारा खात्यातून १८७ अनधिकृत व्यवहार झाले. या व्यवहारांद्वारे एकूण १३ कोटी ९६ लाख रुपये ३६ वेगवेगळ्या बँकांमधील खात्यांमध्ये वळविण्यात आले. त्यानंतर ही रक्कम आणखी १०५ खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. तीन दिवसांत झालेल्या या व्यवहारांपैकी १५ ऑक्टोबरला सहा, १६ ऑक्टोबरला ८८, तर १७ ऑक्टोबरला ९३ व्यवहार करण्यात आले.
मुख्य बँकिंग प्रणाली सुरक्षित
– शाखा, इंटरनेट बँकिंग, भ्रमणध्वनीवरील बँकिंग सेवा तसेच मुख्य बँकिंग प्रणालीतही या व्यवहारांची नोंद नसल्याचे बँकेच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एसएफएमएस सर्व्हरच्या नोंदींमध्ये काही व्यवहारांचे अंशतः पुरावे आढळले,मात्र त्यांचे व्यवहार क्रमांक बँकेच्या नोंदींशी जुळत नव्हते.
– या घटनेनंतर बँकेने रिझर्व्ह बँक, आयएफटीएएस, राष्ट्रीय महत्त्वाच्या माहिती पायाभूत सुविधांच्या संरक्षणासाठी कार्यरत संस्था आणि भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथकाला याबाबत कळविले. बँकेने ग्राहकांच्या खात्यांवर या घटनेचा परिणाम झालेला नसून मुख्य बँकिंग प्रणाली सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे.
– अपहारातील उर्वरित रक्कम कोणाकडे वळविण्यात आली, त्यामागे आणखी किती जणांचा सहभाग आहे आणि आभासी चलन किंवा परदेशी खात्यांद्वारे पैशांची विल्हेवाट लावण्यात आली का, याचा महाराष्ट्र सायबर पोलीस तपास करीत आहेत.
