हृतिकबरोबरच्या वादावर सल्ला देण्यासाठी कंगनाची भेट

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमधील घराणेशाहीबाबत एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना कंगनाने अख्तर यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

जावेद अख्तर यांची कबुली

मुंबई : अभिनेता हृतिक रोशन याच्याशी असलेल्या वादावर तोडगा काढण्याचा सल्ला देण्यासाठी २०१६ मध्ये अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंडोल यांची भेट घेतली होती, असे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यातर्फे बुधवारी उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान सांगण्यात आले.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमधील घराणेशाहीबाबत एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना कंगनाने अख्तर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तिच्या या कृतीमुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागला असल्याचा दावा करत अख्तर यांनी कंगनाविरोधात बदनामीची फौजदारी तक्रार अंधेरी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे केली आहे. न्यायालयानेही त्याची दखल घेत पोलिसांना प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले होते. ही तक्रार आणि कारवाई रद्द करण्याच्या मागणीसाठी कंगनाने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. न्यायालयातील कारवाई लांबविण्याचा कंगनाचा हेतू असल्याचा आरोप अख्तर यांच्यातर्फे न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्यासमोर बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी करण्यात आला.

अख्तर यांनी ओळखीच्या डॉक्टरच्या माध्यमातून आपली भेट घेतल्याचा दावा कंगनातर्फे सुनावणीच्या वेळी करण्यात आला. त्यानंतर हृतिक रोशनसोबतच्या वादावरील तोडग्याबाबत आपण कंगनाची भेट घेतल्याचे आणि त्यांच्यातील वाद सोडवण्याचा प्रयत्न केल्याचे अख्तर यांच्यातर्फे  सांगण्यात आले. त्यावेळी कं गनाने आपला सल्ला ऐकण्यास नकार दिला. त्याबाबतचा सगळा घटनाक्रम महानगर दंडाधिकाऱ्यांसमोरील जबाबातही दिल्याचे अख्तर यांच्यातर्फे सांगण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kangana visits hrithik for advice akp