मुंबई : स्नॅपचॅटवरून बनावट खाते तयार करून ११ वर्षांच्या मुलीची अश्लील छायाचित्रे मागितल्याचा प्रकार कांजूर येथे समोर आला आहे. याप्रकरणी कांजूर मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपी विकृत असून मुलीच्या नावाने बनावट खाते तयार करून लहान मुलींना जाळ्यात ओढत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पीडित मुलगी ११ वर्षांची असून कांजूर परिसरात राहते. काही दिवसांपूर्वी स्नॅपचॅटव या समाजमाध्यमवर तिची एका अनोळखी मुलीशी मैत्री झाली. सान्वी राव नावाच्या या मुलीने asaaanvi_rao नावाच्या आयडीवरून तिच्याशी ओळख वाढवली. पीडित मुलीच्या अजाणतेपणाता गैरफायदा घेत सान्वी रावने तिच्याकडे अश्लील छायाचित्रांची मागणी केली. अजाणतेपणामुले पीडितेने संबंधित मुलीला आपली अश्लील छायाचित्रे पाठविण्यास सुरवात केली. त्यानंतर सान्वी रावची मागणी वाढू लागली. त्यामुळे पीडिता अस्वस्थ झाली आणि सान्वीने तिचे अश्लील छायाचित्रे इंटरनेटवर प्रसारित करण्याची धमकी दिली. यामुळे पीडिता घाबरली. आरोपी मुलगी मोबाइलवरून तिला मेसेज पाठवून धमकावून लागली. अखेर तिने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. तिच्या आईने कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी सान्वी राव नाव धारण केलेल्या स्नॅपचॅट आयडी धारकाविरोधात पोक्सोच्या कलम ६७ (बी), तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमम २००० अंतर्गत गुन्हा दाखल केला.
आम्ही या प्रकरणाचा तपास करीत आहोत. आमचे एक पथक आरोपीच्या मागावर आहे, असे परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी सांगितले. आरोपी मुलगा असण्याची शक्यता आहे. लवकरच त्याला अटक केली जाईल, असेही सागर यांनी सांगितले. इन्स्टाग्राम, स्नॅपचॅप आदी माध्यमे मुलांसाठी घातक ठरू शकतात. पालकांनी मुलांना मोबाइल देताना ते त्याचा काय आणि कसा वापर करतात त्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
मिरा रोड येथे २०२२ मध्ये अशाच प्रकारे अल्पवयीन मुलींची फसवणूक करणार्या एका तरूणाला सायबर पोलिसांनी अटक केली होती. १२ वर्षांच्या मुलीला इन्साटाग्रामवर रिया नावाच्या मुलीची रिक्वेस्ट आली होती. रिया नावाच्या मुलीने १२ वर्षांच्या मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिच्याकडून अश्लील छायाचित्रे मागवली. नंतर याच अश्लील छायाचित्राच्या आधारे तिला वारंवार ब्लॅकमेल करून अश्लील चित्रफिती मागविण्यास सुरवात केली होती. सायबर गुन्हे शाखेने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ इन्स्टाग्राम कंपनीशी संपर्क साधला. आरोपीचा आयपी ॲड्रेस आणि मोबाइल क्रमांक इन्स्टाग्रामकडून मिळवला आणि तौफिक खानला (२१) अटक केली. हा आरोपी एका कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करीत होता. त्याच्याकडे अनेक अल्पवयीन मुलींची अश्लील छायाचित्रे आढळली होती. हा आरोपी मुलीच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाती उघडायचा आणि अल्पवयीन मुलींना मुलगी असल्याचे भासवून मैत्री करायचा. या मुलीना विश्वासात घेऊन त्यांची दिशाभूल करून त्यांची अश्लील छायाचित्रे मागवून त्यांना ब्लॅकमेल करीत होता.