मुंबई : कांजूरमार्ग कचराभूमीतून निघणाऱ्या मिथेन वायू आणि दुर्गंधी उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेने कचराभूमीच्या परिसरातील वायुप्रदूषण आणि दुर्गंधीचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) अंतर्गत राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात ‘नीरी’ची नियुक्ती करण्यात येणार असून, दोन वर्षांच्या या अभ्यासासाठी सुमारे ३ कोटी १ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
कांजूरमार्ग येथील कचराभूमीच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा व प्रदूषणाचा जो त्रास सहन करावा लागतो त्याविरोधात वनशक्ती या स्वयंसेवी संस्थेने आणि एका रहिवासी संघटनेने या कचराभूमीला विरोध करत या विरोधात मुंबई न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने कचराभूमीवरील मिथेन वायूच्या उत्सर्जनासह इतर बाबींचे बारकाईने निरिक्षण करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालिकेने हा अभ्यास अहवाल तयार करण्यासाठी ‘नीरी’ या संस्थेला कंत्राट देण्याचे ठरवले आहे.
२४ महिन्यांच्या कालावधीनंतर अंतिम अहवाल ‘नीरी’ने हा अभ्यास अनुदानित संशोधन प्रकल्प म्हणून करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष खर्च हा अंदाजित प्रकल्प खर्चाच्या केवळ १५ टक्क्यांपर्यंत येऊ शकतो. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या अभ्यासाचे अंतिम निष्कर्ष अहवालाच्या स्वरूपात सादर केले जाणार असून, त्यासोबत संबंधित आकडेवारी आणि विश्लेषणही देण्यात येणार आहे.
‘नीरी’कडून अभ्यासाच्या सहाव्या, बाराव्या आणि अठराव्या महिन्यात प्रगती अहवाल, तर २४ महिन्यांच्या कालावधीनंतर अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे.नीरीच्या कामाचे नियोजन असे – या कामाचे दोन भाग करण्यात आले आहेत. २ कोटी ११ लाख रुपयांच्या पहिल्या भागात कांजूरमार्ग कचराभूमीतून होणाऱ्या मिथेन उत्सर्जनाचे जमिनीवरील सेन्सर, ड्रोन सर्वेक्षण आणि उपग्रह निरीक्षणाच्या माध्यमातून मोजमाप करण्यात येणार आहे. तसेच मिथेनचे संभाव्य ‘हॉटस्पॉट’ शोधून तेथील उष्णता आणि आगीच्या धोक्याचेही मूल्यांकन केले जाणार आहे.
९० लाख रुपयांच्या दुसऱ्या भागात कांजूरमार्ग केंद्राच्या आसपासच्या नागरी भागातील वायुप्रदूषण, दुर्गंधीयुक्त वायू आणि अस्थिर सेंद्रिय संयुगे यांच्या उत्सर्जनाचा अभ्यास केला जाणार आहे. यासाठी सहा महिन्यांच्या कालावधीत १० ठिकाणी चोवीस तास हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण केले जाईल.- हायड्रोजन सल्फाइड, अमोनिया, फॉर्मल्डिहाइड,
सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साइड यांसारख्या प्रदूषकांचे मोजमाप करण्यात येणार आहे.अभ्यासासाठी आवश्यक उपकरणे ‘नीरी’ने निश्चित केलेल्या तांत्रिक निकषांनुसार महापालिका स्वतंत्रपणे खरेदी करणार आहे. ही उपकरणे महापालिकेच्या मालकीची राहणार असून, भविष्यातील निरीक्षणासाठी त्यांचा वापर करता येणार आहे.
नव्वद टक्के कचरा कांजूरमार्ग कचराभूमीवर
कांजूर येथे एकूण ११८.१४ हेक्टर जमिनीवर (सुमारे २९२ एकर) कचराभूमी आहे. मुंबईत दररोज निर्माण होणाऱ्या सात हजार मेट्रीक टन कचऱ्यापैकी ९० टक्के म्हणजेच सुमारे ६,३०० मेट्रिक टन महापालिका घनकचरा कांजूरमार्ग येथील केंद्रात नेला जातो.
