मुंबई : मित्राचा वाढदिवस साजरा करून घरी परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला कांजूरमार्ग परिसरात अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

यश चव्हाण (२१) असे यातील मृत तरुणाचे नाव असून तो चेंबूरच्या रमाबाई नगरमध्ये राहात होता. ऐरोली येथे राहणाऱ्या त्याच्या मित्राचा २७ डिसेंबर रोजी वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी तो दुचाकीवरून ऐरोली येथे गेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे ४ च्या सुमारास तो दुचाकीवरून घरी परत जात होता. त्यावेळी कांजूरमार्ग परिसरात त्याला एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. एका वाहनचालकाने त्याला तत्काळ घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र तो गंभीर जखमी असल्याने त्याला केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले होते.

केईएम रुग्णलयातील अतिदक्षता विभागात यशवर उपचार सुरू होते. यशच्या डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे ३० डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या माध्यमातून त्याचा शोध घेत आहेत.