मुंबई : वडाळा – घाटकोपर – ठाणे – कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड येथे फेब्रुवारीमध्ये उंचावरून संरक्षक कठडा कोसळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता, तर तीन जण जखमी झाले होते. आता पुन्हा याच मार्गिकेच्या कामादरम्यान शनिवारी, १२ सप्टेंबरला वडाळा येथे अपघात झाला असून यात दोन कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वडाळा टीटी पोलीस ठाण्यात उपकंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कंत्राटदार कंपनीला ५ कोटी रुपये, तर सल्लागार कंपनीला एक कोटी रुपये दंड ठोठावला आहे. मुलुंड अपघात ज्या कंत्राटदाराच्या आणि सल्लागाराच्या हलगर्जीपणामुळे वा सुरक्षिततेसंबंधीच्या त्रुटींमुळे झाला होता, त्याच सल्लागार आणि कंत्राटदार कंपनीचा हलगर्जीपणा वडाळा अपघातातही दिसून आला आहे.
मेट्रो ४ मार्गिकेतील मुलुंड येथील अपघातानंतर मेट्रो मार्गिकेच्या कामादरम्यान प्रवासी, नागरिक आणि कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या दुर्घटनेनंतर एमएमआरडीएवर मोठी टीका झाली होती. एमएमआरडीएने या अपघाताची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन केले. कंत्राटदाराला, सल्लागाराविरोधात कारवाई केली आणि यापुढे सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक ती सर्व काळजी घेतली जाईल असे जाहीर केले. इतकेच नव्हे तर मेट्रो ४ मार्गिकेच्या कामाची सुरक्षा तपासणी करण्याचा निर्णय घेत यासाठी स्वतंत्र विशेष सुरक्षा तपासणी पथक तयार करून कामाची सुरक्षा तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना करून सुरक्षेसंबंधीची नियमावली लागू केली. या सर्व गोष्टी केल्यानंतरही शनिवारी, १२ सप्टेंबरला मेट्रो ४ मार्गिकेच्या कामादरम्यान अपघात झाला असून यात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास वडाळा भक्तीपार्क येथे मेट्रो ३ मार्गिकेच्या प्रकल्पस्थळी काम संपवून कामगार घरी परतण्याच्या तयारीत होते. त्यावेळी चार कामगार जिन्याने खाली उतरले. तर नाहिज (३३) आणि साकिम (३७) हे दोघे सुरक्षा पट्टे, हेल्मेट आणि साहित्य गोळा करून बांधकामासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी मचाणावरून खाली उतरू लागले. त्यावेळी अचानक लोखंडी मचाण कोसळले आणि दोघेही जमिनीवर पडले. यात गंभीर जखमी झालेल्या या दोन्ही कामगारांना तातडीने शीव रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी नाहिजला मृत घोषित केले. तर साकिमला अतिदक्षता विभागात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
याप्रकरणी वडाळा टीटी पोलीस ठाण्यात उपकंत्राटदार तारिक-उल-इस्लाम (४०) याच्याविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराच्या आरोपानुसार कामगारांसाठी पुरेशी सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात आली नसून निष्काळजीपणामुळेच दोघांचा बळी गेला आहे. त्यामुळे मेट्रो मार्गिकांच्या कामादरम्यान कंत्राटदार, उपकंत्राटदार, सल्लागार आणि एमएमआरडीएच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या हलगर्जीपणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या प्रकरणी एमएमआरडीएने आरइन्फ्रा-अस्टाल्डी जेव्ही या कंत्राटदाराला पाच कोटींचा दंड ठोठावला आहे. तर सल्लागार कंपनी डीबी इंजिनिअरिंग अँड कन्सल्टिंग जीएमबीएच, हिल इंटरनॅशनल इंक. आणि लुईज बर्जर कन्सल्टिंग प्रा. लिमिटेडला एक कोटी रुपये दंड ठोठावला आहे. या दोन्ही कंपनींकडून कामादरम्यान सुरक्षिततेच्यादृष्टीने हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत एमएमआरडीएने दंडात्मक कारवाई केली. दरम्यान, मेट्रो प्रकल्प असो वा एमएमआरडीएचे इतर प्रकल्प, या प्रकल्पांच्या कामादरम्यान सातत्याने अपघात, दुर्घटना घडत असून यात नागरिकांचा बळी जात आहे. आतापर्यंत एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पांच्या कामादरम्यान झालेल्या अपघातातील मृतांची संख्या १५ च्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामादरम्यानच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता गंभीर झाला आहे.
दंड ठोठावलेल्या कंपनीला एमएमआरडीएकडूनच अभय
शनिवारच्या अपघाताप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवून एक कोटी रुपये दंड ठोठावण्यात आलेल्या कंपनीची मुलुंड अपघातानंतर हकालपट्टी करून त्यांना काळ्या यादीत टाकल्याचे एमएमआरडीएकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र महिन्याभरातच एमएमआरडीएने सल्लागाराविरोधात अशी कोणतीही कारवाई केली नसल्याचे सांगत त्यांचे कंत्राट कायम असल्याचे जाहीर केले. कंपनीला अभय दिले आणि आजही हीच कंपनी सल्लागार म्हणून मेट्रो ४ साठी काम करत आहे. दरम्यान, या कंपनीच्या कामात सातत्याने त्रुटी दिसून येत असल्याचे समोर आल्याने एमएमआरडीएने या कंपनीला दीडशेहून अधिक नोटिसा यापूर्वी बजावल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात कंपनीविरोधात कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. तर आता याच कंपनीवर शनिवारच्या अपघाताचा ठपका ठेवत एक कोटी रुपये दंड ठोठावला. त्यामुळे एमएमआरडीएच्या कारभारावरही यानिमित्ताने प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
