वर्षभरात कामे अनेक, असा प्रचार भाजपने सुरू केला असला तरी वर्षभरात चर्चाच जास्त झाली. कामे झालेली कुठे दिसत नाहीत, अशी टीका करतानाच, महाराष्ट्रातही टोलमुक्तीच्या आश्वासनचे काय झाले, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी शनिवारी केला.
 राज्यात टोलमुक्तीचे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिले होते. उलट नवीन टोलनाके सुरू झाले. भाजपचे राज्यातील वरिष्ठ नेतेच टोलमुक्ती शक्य नाही, अशी विधाने करीत आहेत. मग टोलमुक्तीच्या आश्वासनाचे काय झाले, अशी विचारणा सिब्बल यांनी केली.
दुष्काळ, गारपीट किंवा अवेळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात आलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. मंगोलियात जाऊन पंतप्रधान मोदी यांनी तेथील सरकारला आर्थिक मदत केली. पण देशातील शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही. मोदी सरकारला शेतकऱ्यांबद्दल सहानभुती नाही, अशी टीका त्यांनी केली.
महागाई कमी झाली, असा दावा वित्तमंत्री अरुण जेटली करतात. जेटली यांनी बाजारात जावे म्हणजे डाळी, भाजीपाला, दूध आदींच्या किंमतीत किती वाढ झाली हे त्यांना समजेल. जनधन योजनेचे कौतुक केले जात असले तरी नव्याने खाती उघडलेल्या १४ कोटींपैकी आठ कोटी खात्यांमध्ये शून्य पैसे आहेत. खाते उघडल्यावर बँकांना १७५ रुपये खर्च येतो. हा खर्च करदात्यांच्या खिश्यातून करावा लागत असल्याची टीका सिब्बल यांनी केली.

५३ दिवस परदेशात, ४८ दिवस देशांतर्गत दौरे
 वर्षभराच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ५३ दिवस परदेश दौऱ्यावर होते तर ४८ दिवस त्यांनी देशांतर्गत प्रवास केल्याची माहिती सिब्बल यांनी दिली. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शपथविधीच्या वेळी बोलावून मिठय़ा मारल्या, पण पाकिस्तानबद्दल ठोस धोरण सरकारपाशी नाही.

‘राफाल’ मध्ये घोळ?
पणजी:कोटय़वधी रुपयांच्या राफाल व्यवहारात पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करून फ्रान्ससोबत आंतरसरकार करार न करता आणि संरक्षण साहित्य खरेदीची प्रक्रिया टाळून हा सौदा करण्यावर काँग्रेसने शनिवारी प्रश्नचिन्ह लावले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्स दौऱ्यात दासॉल्त कंपनीकडून उडण्यासाठी तयार असलेली ३६ राफाल विमाने खरेदी करण्याची घोषणा केली. हा निर्णय पूर्णपणे अपारदर्शक असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते टॉम वडक्कम यांनी केली.