उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अल्पसंख्याक मंत्रीपद भूषवणारे कप्तान मलिक पराभूत झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे नवाब मलिक यांचे ते बंधू आहेत. वॉर्ड क्रमांक १६५ मध्ये मलिक यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचे अशरफ अझमी या वॉर्डातून जिंकले आहेत.
कप्तान मलिक यांचा मूळ मतदारसंघ वॉर्ड क्रमांक १७० होता. मात्र हा मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाल्याने कप्तान मलिक यांना १६५ मधून उमेदवारी देण्यात आली. १९७७ साली त्यांचे कुटुंबीय कुर्ला इथे स्थायिक झाले. काँग्रेसचे अशरफ अझमी २०१७ ते २०२२ या कालावधीत १६५ वॉर्डातून निवडून आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने मुंबई महापालिकेच्या प्रचाराची जबाबदारी नवाब मलिक यांच्याकडे सोपवली होती. त्यावरून पक्षाला जोरदार टीकेला सामोरं जावं लागलं होतं. निवडणुकीत नवाब यांचे बंधू कप्तान यांच्यासह बहीण सईदा खान तसंच बुशरा मलिक यांना उमेदवारी देण्यात आली होती.
कोरोना काळात मलिक यांचा एक व्हीडिओ वादग्रस्त ठरला होता. रस्त्याच्या बाजूला काम करणाऱ्या कामगारांना कप्तान दमदाटी करत असल्याचं समोर आलं होतं. भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी कप्तान मलिक यांची वागणूक अशोभनीय असल्याचं म्हटलं होतं. मलिक यांनी कृत्यासाठी दिलगिरी व्यक्त केली होती. कामगारांना मारण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. त्यांच्याबरोबर नेहमी काही लोक असत आणि त्यांनी माझ्यासोबत अरेरावी केली. त्यांच्या उर्मटपणाला प्रतिक्रिया म्हणून माझ्याकडून हे वर्तन झालं. कामगारांना माझ्यामुळे त्रास झाला याचं मला दुःख आहे असं ते म्हणाले होते.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने कप्तान यांना समन्स बजावलं होतं.
