लाेकसत्ता प्रतिनिधी
मुंबई – अभिनेता व निर्माता-दिग्दर्शक सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री मधुराणी गाेखले बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे मोशन पाेस्टर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर समाजमाध्यमांवर प्रदर्शित करण्यात आले. कापूसकाेंडा हा नवीन मराठी चित्रपट असून यात हे दाेघे एकत्र दिसणार असले तरी या चित्रपटाचे ते नायक-नायिका नाहीत. नायकाच्या भूमिकेत आहे कापूसकाेंडा नावाचा श्वान.
जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा. लि. निर्मित या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन सचिन मोहिते यांनी केले असून गणेश पंडित, ऋषिकेश तुरई व सचिन मोहिते यांनी एकत्रितपणे केले आहे. सचिन पाटेकर यांनी छायालेखनाची जबाबदारी निभावली आहे. अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट आणि
भूषण पाटील अशी नव्या पिढीतील कलावंतही यात झळकणार आहेत. ‘ए फॅमिली डॉग फिल्म’ अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे. सचिन पाटेकर यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे संगीत असून अवधूत गुप्ते, पद्मनाभ गायकवाड यांचा स्वरसाज लाभला आहे. सुहास राणे यांनी ध्वनी तंत्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे. एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट साकारला आहे. पोमेरेनियन कुळातील मिश्र प्रजातीचा श्वान ज्याचे नाव कापूसकाेंडा असे आहे, त्याच्याभाेवती फिरणारे असे या चित्रपटाचे कथानक आहे आणि हेच या चित्रपटाचे अनाेखे नावीन्य ठरणार आहे. लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाणार आहे.
