काही दिवसांपूर्वीच मुंबईतील प्रसिद्ध ‘कराची बेकरी’ बंद करण्यात आली. त्यामुळे बेकरीतील पदार्थांच्या चाहत्यांचा हिरमोड झाला होता. ‘मनसेच्या मागणीमुळे कराची बेकरी’ बंद झाली’, अशी देखील चर्चा सुरू झाली होती. शिवाय, मुंबईतून कराची बेकरीने आपला गाशा गुंडाळल्याचं देखील सांगितलं जात होतं. पण आता कराची बेकरी मुंबईतून कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘वांद्रे येथील ज्या जागेत कराची बेकरी सुरू होती, त्या जागेचा भाडेकरार संपल्यामुळेच आम्ही तिथलं आऊटलेट बंद केलं असून आता आम्ही दुसऱ्या जागेच्या शोधात आहोत. आम्हाला जागा मिळताच आम्ही बेकरी पुन्हा सुरू करू’, असं स्पष्टीकरण आता कराची बेकरीचे एक मालक राजेश रामनानी यांनी द प्रिंटशी बोलताना दिलं आहे. रामनानी हैदराबादमध्ये राहात असून त्यांनी ‘आमच्या ब्रँडचं नाव बदलण्याचा कधीही विचार करणार नाही’, असं देखील स्पष्ट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसेनं केला होता दावा…!

मागील वर्षी मनसेकडून कराची बेकरीच्या नावावर आक्षेप घेण्यात आला होता. ‘हे नाव पाकिस्तानमधल्या शहराचं आहे’, असं म्हणून ते हटवण्याची किंवा बदलण्याची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी बेकरीसमोर आंदोलन देखील करण्यात आलं होतं. बेकरी बंद झाल्यानंतर मनसेचे उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी ट्वीट करून “मनसेनं कराची बेकरीचं नाव बदलण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर अखेर बेकरीनं मुंबईतलं आपलं दुकान बंद केलं आहे”, असं म्हटलं होतं.

 

“आम्ही मुंबई सोडणार नाही”

दरम्यान, या मुद्द्यावरून मोठी चर्चा सुरू झालेली असताना आता कराची बेकरीचे मालक राजेश रामनानी यांनी प्रिंटशी बोलताना त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “ब्रँडच्या नावावरून झालेल्या वादाचं आम्हाला दु:ख आहे. मी ९ वर्षांचा असल्यापासून शाळा सुटल्यानंतर मी बेकरीत जात होतो. आमचं या ब्रँडशी भावनिक नातं आहे. काहीही झालं, तरी ब्रँडचं नाव बदलण्याचा आम्ही विचार करणार नाही. जागेचा भाडेकरार संपल्यामुळे आणि व्यवसाय कमी झाल्यामुळे आम्ही दुकान बंद केलं आहे. दुसरी जागा सापडताच आम्ही पुन्हा बेकरी सुरू करू. आम्ही मुंबई सोडत नाही आहोत”, असं देखील रामनानी यांनी स्पष्ट केलं आहे.

 

१९४७मध्ये भारतात स्थलांतरीत झालेले खानचंद रामनानी यांनी १९५३मध्ये कराची बेकरीची स्थापना केली होती. या काळामध्ये कराची बेकरीच्या देशभरात २० शाखा सुरू झाल्या असून दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, मुंबई आणि हैदराबाद या ५ शहरांमध्ये त्या विभागल्या आहेत. आता खानचंद रामनानी यांचे नातू आणि पणतू हा व्यवसाय सांभाळत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karachi bakery not leaving mumbai not change name owner rajesh ramnani on mns objection pmw
First published on: 06-03-2021 at 18:44 IST