मुंबई : कर्जत – लोणावळादरम्यान भूस्खलनामुळे बाधित झालेल्या घाट विभागातील डाऊन आणि मध्य मार्गावरील रेल्वे वाहतूक मध्य रेल्वेने पूर्ववत केली असली, तरी तिसऱ्या मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम अद्याप सुरू आहे. त्यामुळे तिसरी मार्गिका कार्यान्वित होईपर्यंत २४ जुलैदरम्यान अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द, अंशतः रद्द; तसेच पर्यायी मार्गाने चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

कर्जत – लोणावळा घाट भागात ६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. कूरवाडी – मंकी हिलदरम्यान डाऊन मुख्य मार्ग आणि मध्य मार्गावर पहिले भूस्खलन झाले. त्यानंतर काही मिनिटांतच अप मुख्य मार्गावर दुसरे, तर खंडाळा – मंकी हिलदरम्यान मध्य मार्गावर तिसरे भूस्खलन झाले. त्यामुळे तिन्ही रेल्वे मार्गिका बाधित झाल्या आणि घाट विभागातील तिन्ही मार्गिकांवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. काही दिवसात मध्य मार्गिका आणि डाऊन मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या.

सध्या या दोन मार्गिकांवरून रेल्वे वाहतूक सुरू असून, तिसरी मार्गिका पूर्ववत करण्यासाठी राडारोडा हटविणे, रुळांची दुरुस्ती आणि संरक्षक कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कालावधीत सीएसएमटी – चेन्नई एक्स्प्रेस, सीएसएमटी – हैदराबाद एक्स्प्रेस, दादर – साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, दादर – सातारा एक्स्प्रेस, हडपसर – जोधपूर एक्स्प्रेस, दौंड – इंदूर एक्स्प्रेस या महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांसह त्यांच्या परतीच्या फेऱ्याही विविध तारखांना रद्द करण्यात येणार आहेत. याशिवाय, विशाखापट्टणम – एलटीटी, मदुराई – एलटीटी, कराईकल – एलटीटी, चेन्नई – एकतानगर, सिकंदराबाद – राजकोट, पोरबंदर – सिकंदराबाद, पुणे – सांतरागाछी यासह अनेक रेल्वेगाड्या दौंड – मनमाड – इगतपुरी, सुरत – पालधी – मनमाड, सोलापूर किंवा अन्य पर्यायी मार्गांवरून वळविण्यात आल्या आहेत.

तसेच होस्पेट – सीएसएमटी एक्स्प्रेस पुणे येथेच प्रवास समाप्त करेल. तर कोल्हापूर – सीएसएमटी एक्स्प्रेस खडकीपर्यंतच धावेल. दुसरीकडे, सीएसएमटी – कोल्हापूर एक्स्प्रेस पुण्याहून, तर सीएसएमटी – होस्पेट एक्स्प्रेस खडकीहून सुरू करण्यात येणार आहे.

लोणावळा – कर्जतदरम्यान भूस्खलनामुळे साचलेला मातीचा ढिगारा हटवून तिसरी मार्गिका लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेची पथके अत्यंत प्रतिकूल हवामान आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत युद्धपातळीवर काम करीत आहेत. प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वे मदतवाहिनी, एनटीइएस ॲप किंवा मध्य रेल्वेच्या अधिकृत समाज माध्यमांवरील अद्ययावत माहिती तपासावी. तसेच या नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

रेल्वे वाहतुकीवरील परिणाम

– १३ एक्स्प्रेस रद्द

– २० एक्स्प्रेस वळविल्या

– ४ रेल्वेगाड्या अंशतः रद्द

– एकूण ३७ एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम

– २४ जुलैपर्यंत बदल लागू

– दोन मार्गिकांवरून वाहतूक सुरू

– तिसऱ्या मार्गिकेची पुनर्बांधणी सुरू