मुंबई : कर्जत – लोणावळा घाट विभागातील भूस्खलनानंतर झालेल्या भागात युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून मंगळवारी रात्री १०.५० च्या सुमारास मंकी हिल – ठाकूरवाडी दरम्यानची मध्यम मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली. या मार्गावर प्रतितास ३० किमी वेगमर्यादेने रेल्वेगाड्या चालवण्यात येत आहेत. त्यामुळे मुंबई – पुणे अप आणि डाऊन रेल्वेगाड्या धीम्यागतीने मार्गस्थ होत आहेत. तर, उर्वरित दोन मार्गिका बंद असून, त्या मार्गिकांवरील देखभाल-दुरुस्तीची कामे वेगात सुरू आहे.
ठाकूरवाडी – मंकी हिलदरम्यान रविवारी मध्यरात्री १.५५ वाजता डाऊन मुख्य मार्ग आणि मध्य मार्गावर पहिले भूस्खलन झाले. त्यानंतर काही मिनिटांतच अप मुख्य मार्गावर दुसरे, तर खंडाळा – मंकी हिलदरम्यान मध्य मार्गावर तिसरे भूस्खलन झाले. सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास खंडाळा स्थानकाजवळ डाऊन मुख्य मार्गावर झाड कोसळल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव घाट विभागातील तिन्ही मार्गिकांवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली.
दुरुस्तीच्या कामासाठी ४०० हून अधिक कर्मचारी आणि अभियंते, तसेच १० ते १२ जेसीबी आणि अन्य अवजड यंत्रसामग्री तैनात करण्यात आली होती. रुळांवरील माती, दगड आणि झाडे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. त्यानंतर सुमारे ४५ तासांनी मध्यम मार्गिका सुरू करण्यात मध्य रेल्वेला यश आले. मार्गिका सुरू झाल्यामुळे यापूर्वी अन्य मार्गांवर वळविण्यात आलेल्या काही रेल्वेगाड्या आता त्यांच्या मूळ मार्गावरून धावल्या. मात्र, घाट विभागातील उर्वरित दोन मार्गिका अद्याप बंद असून त्या सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर देखभाल व दुरुस्तीची कामे सुरू आहेत.
रेल्वे कर्मचारी व अभियंते प्रतिकूल हवामानातही भूस्खलनामुळे रुळांवर साचलेला मातीचा ढिगारा हटविणे, रेल्वे मार्गाची तपासणी, स्थिरता पडताळणी आणि इतर तांत्रिक कामे वेगाने करत आहेत. उर्वरित मार्गिका सुरक्षित झाल्यानंतरच वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
रेल्वे वाहतुकीवरील परिणाम
रविवार, ५ जुलै
– रात्री १.५५ – ठाकूरवाडी – मंकी हिलदरम्यान पहिले भूस्खलन. – रात्री २.०६ – अप मुख्य मार्गावर दुसरे भूस्खलन. – रात्री ३.०५ – खंडाळा – मंकी हिलदरम्यान तिसरे भूस्खलन.
सोमवार, ६ जुलै
– सकाळी ९.१५ – खंडाळा स्थानकाजवळ डाऊन मुख्य मार्गावर झाड कोसळले. – घाट विभागातील तिन्ही मार्गिकांवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद. – दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू.
मंगळवार, ७ जुलै
– पावसाचा जोर कमी; मात्र अधूनमधून सरी कायम. – रात्री १०.५० वाजता मंकी हिल – ठाकूरवाडी दरम्यानची मध्यम मार्गिका सुरू
बुधवार, ८ जुलै
– मुंबई – पुणे अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वेगाड्या धीम्यागतीने मार्गस्थ – उर्वरित दोन रेल्वे मार्गिकांची देखभाल-दुूरुस्ती सुरू
