मुंबई : कर्जत – लोणावळादरम्यानच्या घाट विभागातील भूस्खलनानंतर मध्य रेल्वेने रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेतले असून, १,१०० हून अधिक कामगार, अभियंते आणि अधिकारी २४ तास कार्यरत आहेत. ७ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. तर, उर्वरित दोन मार्गिका सुरू करण्यासाठी वेगाने काम सुरू आहे.
मार्गिका सुरू झाल्यानंतर ८ जुलै रोजी मध्यरात्री १२.४५ वाजता गाडी क्रमांक ११०१३ लोकमान्य टिळक टर्मिनस – कोयंबतूर एक्स्प्रेस ही पहिली डाऊन दिशेची रेल्वेगाडी ताशी ३० किमी वेगमर्यादेसह मार्गस्थ करण्यात आली. त्यानंतर मध्यरात्री १.५७ वाजता गाडी क्रमांक ११०४१ दादर – साईनगर शिर्डी एक्स्प्रेस सोडण्यात आली. अप दिशेने गाडी क्रमांक १२७०२ हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसैन सागर एक्स्प्रेस पहाटे ५.०९ वाजता रवाना करण्यात आली.
मुसळधार पावसामुळे लोणावळा–कर्जत घाट विभागात अनेक ठिकाणी ६ जुलै रोजी भूस्खलन झाल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. यामुळे अनेक गाड्या रद्द, अन्य मार्गे वळविणे, अंशतः रद्द, अंशतः सुरू करणे, तसेच पुनर्नियोजित कराव्या लागल्या. मुसळधार पाऊस, जोरदार वारे, कमी दृश्यमानता आणि डोंगराळ भौगोलिक परिस्थितीतही रेल्वे कर्मचारी अखंडपणे काम करत आहेत. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी रेनकोट, गमबूट आणि अन्य सुरक्षा साहित्य उपलब्ध करण्यात आले. तसेच त्यांच्यासाठी तंबू, चहा-नाश्ता आणि तीन वेळच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी विविध अवजड यंत्रसामग्री घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे. मोठे दगड वाहून नेण्यासाठी बोल्डर स्पेशल ट्रेन आणि खडी नेण्यासाठी बॅलेस्ट रेक कार्यरत आहे. रेल्वे मार्ग समतल करणे व दुरुस्तीसाठी युनिमॅट मशीन सातत्याने कार्यरत आहे. रेल्वे मार्गाची जिओमेट्री दुरुस्त करण्यासाठी डुओमॅटिक मशीन तैनात केल्या आहेत. ३६०-अंश फिरू शकणारी ८ पोकलेन मशीन कार्यरत आहेत. माती व दरडी हटविण्यासाठी या पोकलेनचा वापर करण्यात येत आहे. खोदकाम, राडारोडा हटविण्यासाठी १२ जेसीबीचा वापर करण्यात येत आहेत.
कामगारांना घटनास्थळी पोहोचविण्यासाठी विशेष श्रमिक गाड्याही चालविण्यात येत आहेत. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून असून, रेल्वे वाहतूक शक्य तितक्या लवकर पूर्ण क्षमतेने पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले.
प्रवाशांनी रेल्वेगाड्यांच्या अद्ययावत माहितीसाठी रेल्वे हेल्पलाइन किंवा एनटीईएस ॲपचा वापर करावा. तसेच अधिकृत समाज माध्यम खात्यावरील सूचनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
