मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला आणि पी. डि’मेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम नियोजित कालावधीत म्हणजेच १० जून रोजी पूर्ण झाले आहे. आता वाहतुकीच्या अनुषंगाने मार्ग रेषा आखणी, पथदिवे, रंगरंगोटी, दिशादर्शक फलक उभारणीची कामे प्रगतिपथावर असून ती येत्या चार दिवसांत पूर्ण होत आहेत. कर्नाक रेल्वे पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी महानगरपालिकेने नियोजन केले आहे.
दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. तब्बल १२५ वर्षे जुना कर्नाक पूल धोकादायक बनल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने घोषित केले होते. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने ऑगस्ट २०२२ मध्ये पुलाचे निष्कासन केले. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. मध्य रेल्वे प्राधिकरणाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार कर्नाक पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. सद्यस्थितीत आर.सी.सी. डेक स्लॅब, डांबरीकरण, महानगरपालिकेच्या हद्दीतील पूर्व आणि पश्चिम बाजूच्या पोहोच रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या पुलाची एकूण लांबी ३२८ मीटर असून रेल्वेच्या हद्दीत ७० मीटर इतकी आहे. महानगरपालिकेच्या हद्दीतील पोहोच रस्त्याची एकूण लांबी २३० मीटर असून पूर्वेस १३० मीटर व पश्चिमेस १०० मीटर इतकी आहे. लोहमार्गावरील पुलाच्या उभारणीकामी आरसीसी आधारस्तंभ यावर प्रत्येकी ५५० मेट्रिक टन वजनी ७० मीटर लांब, २६.५० मीटर रूंद आणि १०.८ मीटर उंचीच्या दोन तुळया स्थापित करण्यात आल्या आहेत.
पूर्व आणि पश्चिमेकडील आरसीसी डेक स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. मार्गिकेवरील काँक्रिट, मास्टिक, ध्वनी रोधक आदी सर्व कामे पूर्ण झाली आहेत. एकूणच पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले असून रंगरंगोटी, दिशादर्शक फलक, पथदिवे, थर्मोप्लास्ट, कॅट आईज आदी उर्वरित कामे १४ जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. पुलाची भारक्षमता, स्थिरता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी १३ जून रोजी भार चाचणी घेण्यात येणार आहे. त्याचे परिणाम ४८ तासानंतर म्हणजेच १५ जून रोजी प्राप्त होणे अपेक्षित आहे. वाहतूक पोलीस विभागाच्या विशेष परवानगीने, महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत मागील दोन महिने दररोज २४ तास पुलाचे काम सुरू होते. त्यामुळे विक्रमी वेळेत पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण करणे शक्य झाले आहे. भार चाचणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेच्या तज्ज्ञांशी सल्लामसलत करून आणि वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून पूल वाहतुकीस खुला करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी पूर्व – पश्चिम मुख्य वाहतूक मार्ग नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे. पदपथाचे काम पूर्ण झाले असले तरी पश्चिम दिशेकडील रस्त्याचे काम पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहे. त्यामुळे जिन्याचे काम पावसाळ्यानंतर हाती घेतले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीचे फायदे
– मुंबई शहराच्या दक्षिणेतील पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा
– पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी सुरक्षित व वाढीव सुविधा उपलब्ध होणार
– पूर्व मुक्तमार्गावरून येणारी वाहतूक, तसेच पी. डि’मेलो मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत
– पी. डि’मेलो मार्गावरून गिरगाव, चर्चगेट, मंत्रालय, काळबादेवी, धोबी तलाव परिसरात वाहतूक सुविधा
– युसूफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, काझी सय्यद मार्ग या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार