scorecardresearch

कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ प्रदर्शनपूर्व ८ कोटी कमाईच्या अपेक्षेत

बहुचर्चित ‘शहजादा’ चित्रपटाच्या तिकीटविक्रीला मिळणारा प्रतिसाद पाहता प्रदर्शनपूर्व हा चित्रपट ८ कोटींची कमाई करेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

Karthik Aaryan Shahzada
कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ प्रदर्शनपूर्व ८ कोटी कमाईच्या अपेक्षेत (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

मुंबई : दाक्षिणात्य कलाकार आणि हिंदी चित्रपट किंवा हिंदी चित्रपट आणि दाक्षिणात्य कलाकार असा संगम याआधी आपण अनुभवला आहे. दाक्षिणात्य चित्रपटांचे डझनावारी रिमेकही आपल्याला नवीन नाहीत. मात्र आपल्याच सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी रिमेकची तयारी हिंदीतील आघाडीच्या कलाकाराला घेऊन करण्याचा वेगळा प्रयोग सध्या ‘शहजादा’ या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनची निर्मित, कार्तिक आर्यन अभिनीत ‘शहजादा’ या येत्या शुक्रवारी प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या चित्रपटासाठी आगाऊ तिकीटविक्री सुरू झाली आहे. बहुचर्चित ‘शहजादा’ चित्रपटाच्या तिकीटविक्रीला मिळणारा प्रतिसाद पाहता प्रदर्शनपूर्व हा चित्रपट ८ कोटींची कमाई करेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जून याची मुख्य भूमिका असलेला ‘अला वैकुंठपुरमलो’ हा तेलुगू चित्रपट २०२० च्या जानेवारीत प्रदर्शित झाला होता. तिकीट खिडकीवर प्रचंड यशस्वी ठरलेल्या या चित्रपटाने तेलुगू भाषेतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून विक्रम केला आहे. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकच्या निर्मितीचे शिवधनुष्य टी सीरीजच्या भूषण कुमार यांच्या बरोबरीने अल्लू अर्जुननेही उचलली आहे. अल्लू अर्जुनच्या गीता आर्ट्स या निर्मितीसंस्थेंतर्गत चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

हेही वाचा – मुंबई : पहिल्या विद्युत दुमजली वातानुकूलित बसमुळे बेस्टचा तोटा घटणार? एका किमीमागे १९ रुपये नफा

हेही वाचा – Malad Fire: मुंबईच्या मालाड येथील झोपडपट्टीत अग्नीतांडव; जवळपास ५० झोपड्या जळून खाक, एकाचा दुर्दैवी मृत्यू

कार्तिक आर्यन आणि क्रिती सनन ही जोडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून, दिग्दर्शन अभिनेता वरुण धवनचा भाऊ रोहितने केले आहे. गेल्या वर्षा-दीड वर्षात कार्तिकचा चाहतावर्ग मोठ्या संख्येने वाढला असल्याने ‘शहजादा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच हा चित्रपट चर्चेत आहे. हा चित्रपट १० फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र ‘पठान’ चित्रपटाला मिळालेले विक्रमी यश आणि प्रतिसाद पाहता निर्मात्यांनी ‘शहजादा’चे प्रदर्शन १७ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. आता सोमवारपासूनच या चित्रपटाच्या आगाऊ तिकीटविक्रीला सुरुवात झाली असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आगाऊ तिकीटविक्रीला मिळणारा प्रतिसाद पाहता चित्रपट प्रदर्शनपूर्व ८ कोटींची कमाई करेल, असे निर्मात्यांकडून जाहीर करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-02-2023 at 17:36 IST

संबंधित बातम्या