मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन यानेही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच, ऑनलाइन माध्यमांवर होणाऱ्या त्याच्या व्यक्तिमत्त्व हक्कांच्या (पर्सनॅलिटी राईट्स) कथित अनधिकृत व्यावसायिक वापरापासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. कार्तिकने अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्स व समाजमाध्यम व्यासपीठांविरुद्ध, तसेच आपली छायाचित्रे आणि चित्रफीतींचा गैरवापर केल्याचा आरोप असलेल्या काही अज्ञात व्यक्तींविरुद्ध बौद्धिक संपदा हक्क कायद्यांतर्गत दावा दाखल केला आहे.

कार्तिकच्या याचिकेनुसार, त्याचे नाव, प्रतिमा आणि चेहरा यांचा वापर विविध वस्तू, जाहिराती आणि इतर डिजिटल मजकुरावर परवानगीशिवाय केला जात आहे; त्यामुळे त्याच्या प्रसिद्धी आणि खासगी जीवन जगण्याच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे, असा दावा कार्तिकने केला आहे. तसेच, प्रतिवादींना व्यावसायिक उद्देशांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डीपफेकचा वापर करून आपली छायाचित्रे, चित्रफिती, आवाज किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक वैशिष्ट्यांचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी कायमस्वरूपी मनाई आदेश देण्याची मागणी केली आहे.

ऑनलाइन व्यासपीठे आणि संबंधित अधिकाऱ्यांना असा मजकूर काढून टाकण्याची, तसेच त्यामागे असलेल्या व्यक्तींची ओळख उघड करण्याची मागणीही कार्तिकने याचिकेद्वारे केली आहे.