मुंबई : आसनगाव – कसारा तिसऱ्या मार्गिकेच्या प्रकल्पांतर्गत कसारा यार्डमध्ये ओव्हरहेड उपकरणांची जोडणी करण्यासाठी मध्य रेल्वेकडून ३० ऑक्टोबरच्या मध्यरात्री विशेष वाहतूक व विद्युत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे कसारा – खर्डी विभागातील काही मेल – एक्स्प्रेस गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता असून, दोन लोकलच्या थांब्यांमध्येही बदल करण्यात येणार आहेत.
कसारा यार्डमधील ओव्हरहेड उपकरणांच्या जोडणीसाठी ३०-३१ ऑक्टोबर आणि ३१ ऑक्टोबर-१ नोव्हेंबर या दोन्ही रात्री ३ ते पहाटे ५.३० या वेळेत ब्लॉक घेण्यात येईल. उंबरमाळी – कसारा दरम्यानच्या अप आणि डाऊन मुख्य मार्गावर हा ब्लॉक असेल. या कामाचा परिणाम खर्डी – कसारा दरम्यानच्या अप आणि डाऊन मुख्य मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर होणार आहे.
या ब्लॉकमुळे ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी दानापूर – एलटीटी विशेष, नंदीग्राम एक्स्प्रेस, कर्मभूमी एक्स्प्रेस, अमरावती – सीएसएमटी एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेस, पंजाब मेल, नागपूर – सीएसएमटी दुरांतो आणि राणी कमलापती – एलटीटी एक्स्प्रेस या गाड्यांना विलंब होण्याची शक्यता आहे. याशिवाय, १ नोव्हेंबर रोजी सहरसा – एलटीटी आणि शालीमार – एलटीटी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावरही परिणाम होऊ शकतो. लोकल सेवांमध्ये कसारा येथून मध्यरात्री ३.५१ आणि पहाटे ४.५९ वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी दिशेकडील लोकल कसारा ते कल्याणदरम्यान तिसऱ्या मार्गिकेवरून चालविण्यात येतील.
या दोन्ही लोकलना उंबरमाळी आणि खर्डी स्थानकांवर थांबा मिळणार नाही. त्यामुळे या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था आणि वेळापत्रक लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.
