मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कसारा घाट परिसरात ओव्हरहेड इक्विपमेंटशी (ओएचइ) संबंधित अडथळे दूर करण्याच्या पूर्वतयारीसाठी २ जून ते ५ जून २०२६ दरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे आसनगाव – कसारादरम्यान दुपारी लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार असून अनेक लोकल अंशतः रद्द करण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २ जून ते ५ जून या कालावधीत दररोज दुपारी ३.५० ते सायंकाळी ५.५० या वेळेत दोन तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक इगतपुरी – खर्डीदरम्यान अप मार्गिका, मध्यम मार्गिका, अप यार्ड मार्गिका, तसेच थळ घाट रिव्हर्सल केबिन परिसरात राबविण्यात येणार आहे. या कालावधीत आसनगाव – कसारादरम्यान कोणतीही लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषतः कसारा आणि आसपासच्या ग्रामीण भागातून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि विद्यार्थ्यांना पर्यायी प्रवासाची व्यवस्था करावी लागणार आहे.
ब्लॉकदरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या काही कसारा लोकल आसनगाव येथेच अंशतः रद्द करण्यात येणार आहेत. विशेष ब्लॉक कालावधीत दुपारी १.१०, २.१७ आणि २.४६ वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी – कसारा लोकल आसनगावपर्यंतच धावतील. तसेच कसाराहून सुटणाऱ्या काही लोकल आसनगाव येथून सुरू करण्यात येणार आहेत. कसाराहून दुपारी ३.३५ वाजता सुटणारी लोकल आसनगावहून दुपारी ४.१२ वाजता सुटेल. तसेच कसाराहून दुपारी ४.१६ वाजताची सुटणारी लोकल आसनगावहून ४.५४ वाजता, तर, कसाराहून सायंकाळी ५.०२ वाजता सुटणारी लोकल आसनगावहून ५.३९ वाजता सुटेल.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ब्लॉकपूर्वी कसारासाठीची शेवटची लोकल ही दुपारी १२.३० वाजता सीएसएमटीहून सुटेल, तर सीएसएमटीकडे येणारी शेवटची लोकल कसाराहून दुपारी २.४२ वाजता रवाना होईल. ब्लॉकनंतर कसारासाठीची पहिली लोकल दुपारी ४.५० वाजता सीएसएमटीहून सुटेल. तर, कसाराहून सीएसएमटीकडे जाणारी पहिली लोकल सायंकाळी ६.१७ वाजता रवाना होणार आहे.
पायाभूत सुविधा अधिक सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी हे काम अत्यावश्यक आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करून सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
