नवाब मलिकांच्या आरोपांवर काशिफ खान यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी कधीही…!”

काशिफ खान यांनी पार्टीसंदर्भात नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

kashif khaan on nawab malik allegations
काशिफ खान यांनी पार्टीसंदर्भात नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

कॉर्टेलिया क्रूज आणि त्यावर झालेली पार्टी हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. याच पार्टीमधून एनसीबीनं आर्यन खानला आधी ताब्यात घेतलं होतं आणि नंतर अटक केली होती. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केला असून या पार्टीचे आयोजक काशिफ खान समीर वानखेडेंचे मित्र असल्यामुळेच त्यांना अटक केली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे नवे आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळले असले, तरी यासंदर्भात काशिफ खान यांची भूमिका महत्त्वाची मानली जात होती. अखेर काशिफ खान यांनी यासंदर्भात आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली असून नवाब मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. एबीपीशी बोलताना काशिफ खान यांनी आपली भूमिका मांडली आहे.

“नवाब मलिक यांच्याकडे अपुरी माहिती”

“नवाब मलिक यांच्याकडे अपुरी माहिती आहे. मला वाटतं की त्यांच्याकडे सर्व चुकीची माहिती आहे. माझा कोणत्याही ड्रग्जच्या व्यवहाराशी संबंध नाही. मी साधी सिगारेटही ओढत नसल्याचं लोकांना माहितीये. माझ्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत, चुकीचे आहेत. ते असं का करत आहेत हेही मला माहिती नाही. मी त्यांना ओळखत नाही, मी कधीही त्यांना भेटलेलो नाही. मला माहिती नाही ते मला यात का ओढत आहेत. पण मला खात्री आहे की त्यांना ज्यांनी कुणी चुकीची माहिती दिली आहे, त्यामुळे त्यांचा गैरसमज झाला आहे”, असं काशिफ खान म्हणाले आहेत.

शस्त्र आलं कुठून? काशिफ खान म्हणतात…!

दरम्यान, काशिफ खान यांच्यासोबत असणाऱ्या महिलेजवळ शस्त्र होतं, या आरोपावर देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलं. “तुम्हाला वाटतं कुणीही सीआयएसएफची सुरक्षा पार करून एक साधी टॉय गन देखील घेऊन जाऊ शकतं? असं बोलणं मला निरर्थक आणि वेळ वाया घालवणारं आहे. मला वाटत नाही की यावर आपण चर्चा देखील करायला हवी. आणि जर असं घडलंय, तर लोकांना शोध घेऊ द्या. क्रूजसाठी जी सरकारी सुरक्षा एजन्सी होती, त्यांना विचारा की हे आलं कुठून?” असं काशिफ खान म्हणाले.

“समीर वानखेडेंना ओळखतही नाही”

समीर वानखेडेंचे मित्र असल्यामुळेच काशिफ खान यांना अटक करण्यात आली नसल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्यावर बोलताना, “मी समीर वानखेडेला ओळखत नाही. नवाब मलिक हे का बोलत आहेत? कशासाठी बोलत आहेत? हे त्यांना विचारलं पाहिजे. समीर वानखेडेंशी कधीही मैत्री, चर्चा, भेट झालेली नाही. मी कधीही त्यांना भेटलो किंवा बोललेलो नाही”, असं ते म्हणाले.

कार्यक्रम काशिफ खान यांनीच आयोजित केला होता?

नवाब मलिक यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत केलेल्या आरोपांना देखील काशिफ खान यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मी हा कार्यक्रम आयोजित केला नव्हता. दिल्लीच्या एका कंपनीनं हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कंपनीच्या लोकांना आधीच ताब्यात घेण्यात आलं आहे. मी तिथल्या सर्व गोष्टींसाठी माझ्या क्रेडिट कार्डमधून पैसे भरले आहेत. माझ्याकडे सर्व बिलं आहेत. मी कुठेही येऊन हे सिद्ध करण्यासाठी तयार आहे”, असं ते म्हणाले.

“स्पॉन्सर्सला जबाबदार धरणार का?”

दरम्यान, पार्टीसाठीच्या पोस्टर्समध्ये एफटीव्हीचा देखील लोगो होता. काशिफ खान हे एफटीव्हीचे संचालक आहेत. यासंदर्भात विचारणा केली असता त्यावर ते म्हणाले, “पोस्टरमध्ये दोन नावं होती. एक एफटीव्ही आणि दुसरं जॉनी वॉकर. आयपीएलच्या पोस्टरवर २५ लोकांची नावं असतात. आयपीएलमध्ये काही गोंधळ झाला, तर त्यासाठी हे स्पॉन्सर जबाबदार असतात का?”, असा सवाल त्यांनी केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kashif khan replies on nawab malik allegations drugs on cruse party sameer wankhede pmw

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या