मुंबई : चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात बुधवारी एका रुग्णाने आत्महत्या केली. या प्रकरणी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी पाहणी केली. या प्रकरणात वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली आहे का, रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे का याची स्वतंत्र व सखोल विभागीय चौकशी करावी, अशी मागणी पेडणेकर यांनी केली. चौकशीच्या नावाखाली दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.
चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात बुधवारी एका रुग्णाने आत्महत्या केली. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी कस्तुरबा रुग्णालयात जाऊन या प्रकरणाची चौकशी केली. याबाबत त्या म्हणाल्या की, रुग्णाने केलेली आत्महत्या ही मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे अपयश अधोरेखित करणारी अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना आहे. या घटनेमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणा, प्रशासकीय अनास्था आणि रुग्णांच्या सुरक्षिततेबाबतची बेफिकिरी पुन्हा एकदा उघड झाली आहे.
या प्रकरणात वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कर्तव्यात केलेला कसूर, रुग्णालय प्रशासनाची हलगर्जी आणि वैद्यकीय सेवेतील शिस्तभंग यांची स्वतंत्र व सखोल विभागीय चौकशी तातडीने करण्यात यावी. चौकशीच्या नावाखाली दोषींना पाठीशी घालण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. मुंबई महानगरपालिका अधिनियम, रुग्णालयीन संहिता आणि लागू सेवा नियमांनुसार दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची, तसेच आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवनंदा लावंड उपस्थित होते. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाचा जीव सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी रूग्णालय प्रशासनाची असताना अशी घटना घडणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. याप्रकरणी जबाबदारी निश्चित करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली.
दरम्यान, तो रुग्ण रस्त्यावर राहणारा अंमली पदार्थाचे व्यसन करणारा होता. या रुग्णाला काही नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र रुग्णाने त्याच्याकडील टॉवेलने प्रसाधनगृहात गळफास लावून घेतला. या प्रकरणी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असून अशा संवेदनशील प्रकरणात प्रशासनाने काळजी घ्यावी, असे आरोग्य समिती अध्यक्ष हरिश भांदिर्गे यांनी दिले.
