मुंबई : अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या आणि केक व बेकरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या कयानी बेकरीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) रद्द केला. या बेकरीची एफडीएकडून २७ सप्टेंबर रोजी तपासणी करण्यात आली होती.

अन्न तयार करणे व साठवणूक क्षेत्रात मांजर, उंदरांची विष्ठा, जिवंत माशा, मृत झुरळे, फ्रिजमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त साचलेले व प्रक्रिया विभागात उघडे मॅनहोल आढळून आले. तसेच अन्नपदार्थ जमिनीवर ठेवणे, कच्चे पीठ वृत्तपत्र कागदाने झाकणे, कर्मचाऱ्यांकडून आवश्यक स्वच्छता व पीपीईचा वापर न करणे व कच्चे व तयार अन्नपदार्थांचे अयोग्य विभाजन अशा गंभीर त्रुटी आढळल्या.

स्वच्छता त्रुटींमुळे ग्राहकांच्या आरोग्यास तात्काळ धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन एफडीएने तत्काळ परवाना निलंबित केला. तसेच आस्थापनास अन्नपदार्थांची खरेदी, उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, विक्री व वितरण तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आस्थापनावर देखरेख ठेवण्यात येत आहे.

कयानी बेकरीबरोबरच कुलाबा स्वीट मार्ट, धारावीतील अरुण विलास फरसाण, परळमधील रूची वेज रेस्टॉरंट, क्यूएसआर ब्रँड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, फोर्टमधील अस्त्र कॉर्पोरेशन (रॉयल चायना), वांद्रे पश्चिमेकडील टिफिन, सांताक्रूझ पश्चिमेकडील युनायटेड बेकरी ॲण्ड स्टोअर्स, जोगेश्वरी पश्चिमेकडील श्री पद्मावती एंटरप्रायझेस, खार पश्चिमेकडील हॉटेल पुरंदर विलास, विलेपार्ले येथील ‘डॅफोडिल्स फास्ट इन, लोअर परेल येथील ‘सबवे (एव्हरसब इंडिया प्रा. लि.), चेंबूर येथील ‘एस. एस. कॅटरर्स’चा या आस्थापनांचा परवाना स्वच्छतेच्या त्रुटींमुळे ग्राहकांच्या आरोग्यास निर्माण होत असल्याचा धोका लक्षात घेऊन निलंबित करण्यात आला.