मुंबई : पंधरा वर्षांपूर्वी अंबोली येथे छेड काढणाऱ्यांविरुद्ध मैत्रिणींचा बचाव करताना दोन तरुणांची हत्या झाली होती. या प्रकरणी तीन आरोपींना दोषी ठरवण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी कायम ठेवला, परंतु त्यापैकी दोघांची हत्येच्या आरोपातून न्यायालयाने मुक्तता केली.

न्यायमूर्ती मकरंद कर्णिक व न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने गुरुवारी या प्रकरणी निर्णय देताना जितेंद्र राणा याला हत्येप्रकरणी दोषी ठरवण्याचा निर्णय कायम ठेवला. मात्र विशेष न्यायालयाने २०१६ मध्ये त्याला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा कमी करून २० वर्षांच्या कारावासात रूपांतरित केली. खंडपीठाने इतर दोघांची हत्येच्या आरोपातून मुक्तता केली. परंतु त्यांना किरकोळ दुखापत पोहोचवल्याप्रकरणी दोषी ठरवून, विशेष न्यायालयाने २०१६ मध्ये सुनावलेली एक वर्षाची शिक्षा कायम ठेवली.

पंधरा वर्षांपूर्वी, २० ऑक्टोबर २०११ रोजी मुंबईतील अंधेरी परिसरातील अंबोली येथे, कीनन सँटोस (वय २४) व रुबेन फर्नांडिस (२९) यांची काही तरुणांनी हत्या केली होती. आपल्या दोन मैत्रिणींची छेड काढणाऱ्या तरुणांना जाब विचारल्यामुळे आरोपींनी कीनन व रुबेन यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. पुढे, २०१६ मध्ये, विशेष न्यायालयाने या प्रकरणी जितेंद्र राणा, सतीश दुळगज, सुनील बोथ व दीपक पिवाल या चौघांना हत्येसह इतर गुन्ह्यांसाठी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

आरोपींपैकी एक, सतीश दुळगज याचा उच्च न्यायालयातील अपील प्रलंबित असतानाच मृत्यू झाला. विशेष न्यायालयाने राणा व दुळगज यांना हत्येव्यतिरिक्त विनयभंगाच्या आरोपाअंतर्गतही दोषी ठरवले होते. उच्च न्यायालयाने गुरुवारी अपिलावर निर्णय देताना, राणा याला हत्येप्रकरणी दोषी ठरवण्याचा निर्णय कायम ठेवला, परंतु विशेष न्यायालयाने त्याला दिलेली जन्मठेपेची शिक्षा कमी करून २० वर्षांच्या कारावासात रूपांतरित केली. घटनेच्या वेळी राणा २५ वर्षांचा होता. ही बाब लक्षात घेता, त्याला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा कमी करून २० वर्षांच्या कारावासात रूपांतरित करत आहोत. तथापि, त्यात कोणतीही सवलत मिळणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

सुनील बोथ आणि दीपक पिवाल या दोघांची हत्येच्या आरोपातून मुक्तता करताना, त्यांच्याविरुद्धचा हा आरोप सिद्ध झालेला नाही. मात्र, साधी दुखापत पोहोचवण्याच्या आरोपाखाली त्यांना दोषी ठरवण्याचा निर्णय कायम ठेवत असल्याचे आणि विशेष न्यायालयाने त्यांना सुनावलेली एक वर्षाची शिक्षाही कायम ठेवत असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्याविरुद्ध इतर कोणताही खटला प्रलंबित नसेल, तर या दोघांची कारागृहातून सुटका केली जावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

प्रकरणाची पार्श्वभूमी

सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, सँटोस आणि फर्नांडिस यांनी आरोपींना जाब विचारला आणि त्यापैकी एकाच्या कानशिलात लगावली. त्यानंतर आरोपी तिथून निघून गेले, परंतु जाताना त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. काही वेळाने आरोपी सुऱ्या, क्रिकेटचा स्टंप आणि बांबूची मोठी काठी सोबत घेऊन परत आले. त्यांनी सँटोस आणि फर्नांडिस यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. तर, विनयभंगाची कोणतीही घटना घडलीच नव्हती; उलट, पीडितांनी एका आरोपीच्या कानशिलात लगावल्यानंतरच मारामारी झाली होती, असा दावा आरोपींकडून करण्यात आला.