मुंबई : महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सर्वोत्कृष्ट व यशस्वी अंमलबजावणी करणारे रुग्णालय म्हणून केईएम रुग्णालयाला यंदाचा ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, चतुर्थश्रेणी कर्मचारी यांनी केलेली रुग्ण सेवा आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी रुग्णालयामध्ये ‘एंड टू एंड क्लेम मॅनेजमेंट मॉडेल’चा वापर करण्यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे केईएम रुग्णालयाला हा पुरस्कार मिळाला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये २०१२ ते २०१७ या काळात सरकारी आरोग्य योजनांचे दावा (क्लेम) भरण्यात आले. मात्र या काळात प्रशिक्षित मनुष्यबळाच्या अभावामुळे आणि प्रशासकीय ढिसाळपणामुळे सुमारे ५० कोटी रुपयांहून अधिकचे दावे नाकारण्यात आले. यातून महानगरपालिकेला प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले, तर गरीब रुग्णांना मोफत उपचारांपासून वंचित राहावे लागले. हा रुग्णांच्या जीवाशी खेळ थांबवण्यासाठी ॲड. आशिष शेलार यांनी २०१५ मध्ये पुढाकार घेऊन क्रिएटिव्ह सोल्युशन्सचे विकास देशमुख यांनी तयार केलेली ‘एंड टू एंड क्लेम मॅनेजमेंट’ ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली.

क्रिएटिव्ह सोल्युशन्सने १ जानेवारी २०१८ पासून मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये हे मॉडेल राबवायला सुरुवात केली. परिणामी, सर्व रुग्णालयांमध्ये १०० टक्के रुग्ण विमा संरक्षण, दरवर्षी सरासरी ८४ कोटी रुपयांचे दावे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. विमा दावे निकाली निघू लागल्याने २०१८ ते २०२५ या काळात महानगरपालिकेच्या महसुलात वाढ झाली. तसेच एकही रुग्ण, नातेवाईक किंवा अधिकाऱ्याकडून कंपनीविरोधात तक्रार आली नाही.

‘एंड टू एंड क्लेम मॅनेजमेंट’ या संकल्पनेमुळे मुंबईतील लाखो गरीब रुग्णांना कोट्यवधी रुपयांचे मोफत उपचार मिळत आहेत. राज्यातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार केईएम रुग्णालयाला मिळाला असला तरी गरीबाचा जीव वाचवणे हीच खरी सेवा आहे. हा पुरस्कार म्हणजे केवळ केईएमचा नाही, तर मुंबईतील प्रत्येक गरीब रुग्णाच्या चेहऱ्यावरील समाधानाचा विजय असल्याचे मत ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केले.