मुंबई : केईएम रुग्णालयाने सातत्याने चांगली आरोग्य सेवा देऊन सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. तज्ज्ञ डॉक्टर्स, आधुनिक तंत्रज्ञान व दर्जेदार आरोग्य सेवेमुळे केईएमचा देशभरात लौकिक आहे. आता केईएम रुग्णालयामध्ये जागतिक दर्जाचे ‘माँ’ आयव्हीएफ (इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन) केंद्र सुरू करण्यात आले आहे.

ही सुविधा सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा माफक दरात उपलब्ध व्हावी, असे मत सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले. केईएम रुग्णालयात अत्याधुनिक ‘आयव्हीएफ’ केंद्राचे उद्घाटन आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार अजय चौधरी, मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत व तज्ज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते.

केईएम रुग्णालय शासनाच्या धोरणाशी सुसंगत राहून दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व माफक दरात नागरिकांना आरोग्यसेवा पुरवण्याचे काम करत आहे. या रुग्णालयात सुरू झालेल्या आयव्हीएफ केंद्राच्या माध्यमातून वंध्यत्व उपचारांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे. केईएममध्ये सुरु होत असलेल्या मॉँ आयव्हीएफ केंद्राच्या डॉ. अंजली आणि डॉ. अनिरुद्ध मालपाणी यांनी आपल्या मातृसंस्थेला ‘आयव्हीएफ’ केंद्राच्या रूपाने मोलाची गुरुदक्षिणा दिली आहे. त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. राज्य सरकारच्या वतीने केईएम रुग्णालयातील सेवा गतिमान करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली

एकत्रित जन आरोग्य योजनेमार्फत अंगीकृत शासकीय व खासगी रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा दिली जात असून, उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ इतकी वाढवण्यात आली आहे. अंगीकृत रुग्णालयांची संख्या सुद्धा १७९२ वरून ४५३७ पर्यंत वाढवण्यात आली आहे. उपचारांच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. ही सुविधा अधिक सुलभ व पारदर्शक होण्यासाठी टीएमएस २.० हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आरोग्यमंत्र्यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.