मुंबई : वेळेवर निदान व तपासण्या न झाल्याने स्तन कर्करोगाचे रुग्ण मागील काही वर्षांपासून वाढत आहे. त्यामुळे महिलांमधील स्तन कर्करोगाची तपासणी जलद गतीने करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये अत्याधुनिक थ्रीडी डिजिटल टोमोसिंथेसिस मॅमोग्राफी यंत्र आणण्यात आले आहे. या यंत्रामुळे अवघ्या पाच मिनिटांत स्तनांची तपासणी करता येणार असून, या यंत्रामुळे प्राथमिक टप्प्यामध्ये असलेल्या कर्करोगाचे निदान शक्य होणार असल्याने महिलांवर वेळेत उपचार मिळून स्तन कर्करोग बरा होण्याची शक्यता वाढणार आहे.

निदान व उपचार वेगवान होणार

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यामध्ये २०२३ मध्ये ३३ हजार ६०० नव्या स्तन कर्करोगाच्या रुग्णांची नोंद झाली होती. यातील बहुसंख्य रुग्ण मुंबई, पुणे, नागपूर आणि ठाण्यासारख्या शहरी भागामध्ये आढळले होते. राज्यातील स्तन कर्करोगाच्या रुग्णांची संख्या २०१९ मध्ये २६ हजार २०० इतकी होती. प्राथमिक अवस्थेतील स्तन कर्करोगाचे निदान वेळेवर झाल्यास त्यावर जलद गतीने उपचार करणे शक्य होते. केईएम रुग्णालयामध्ये नव्याने आणण्यात आलेल्या थ्रीडी डिजिटल टोमोसिंथेसिस मॅमोग्राफी या यंत्रामुळे सुमारे ७० मायक्रोन इतक्या सूक्ष्म गाठींची ओळख पटविण्याबरोबरच पारंपरिक टूडी यंत्राच्या तुलनेत तब्बल १५ महिने आधी रोगनिदान करणे शक्य होणार आहे. या यंत्रामध्ये किरणोत्सर्गाचे प्रमाण सुमारे ३० टक्क्यांनी कमी असल्याने रुग्णांना तपासणीदरम्यान होणारा त्रासही कमी होतो. बायोप्सी प्रक्रिया केवळ १३ मिनिटांत पूर्ण करता येणार असल्याने उपचार प्रक्रिया अधिक वेगवान होणार आहे. यामुळे वेळेत स्तन कर्करोगाचे निदान होऊन तात्काळ उपचार करणे शक्य होणार आहे.

एमआरआयची आवश्यकता नाही

यंत्रामुळे तरुण महिलांमधील स्तन कर्करोगाचे प्रभावीपणे निदान करणे शक्य होणार आहे. यासाठी एमआरआय करण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे वेळ आणि खर्च या दोन्हीची बचत होणार आहे. या यंत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला असल्याने क्ष किरणतज्ज्ञ यांच्यासाठी हे यंत्र सहाय्यक ठरणार आहे.

पंचतारांकित रुग्णालयातील उपचार आता केईएममध्ये

थ्रीडी डिजिटल टोमोसिंथेसिस मॅमोग्राफी या यंत्राचा वापर मुंबईतील काही मोजक्या मोठ्या खासगी रुग्णालयांबरोबरच टाटा रुग्णालयामध्ये करण्यात येतो. मात्र आता केईएम रुग्णालयामध्येही या यंत्राद्वारे उपचार करण्यात येत आहेत. आयसीआयसीआय फाऊंडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीतून हे यंत्र केईएम रुग्णालयात उपलब्ध करण्यात आले आहे. केईएमसारख्या शासकीय रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध झाल्याने सर्वसामान्य रुग्णांना उच्च दर्जाची तपासणी परवडणाऱ्या दरात मिळणार आहे. केईएम रुग्णालयात डॉ. शिल्पा राव यांच्या नेतृत्वाखाली २००९ पासून ‘स्तनशुश्रुषा’ हा विशेष बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभाग सुरू असून, स्तन कर्करोग उपचारासाठी तो कार्यरत असल्याची माहिती केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली.

नव्या तंत्रज्ञानामुळे महिलांना दिलासा

प्रत्येक महिलांनी वयाच्या ४० व्या वर्षांनंतर वर्षभरात किमान एकदा तपासणी करणे आवश्यक आहे. ज्या महिलांच्या कुटुंबात स्तन कर्करोगाचा इतिहास आहे, त्यांनी ३५ वर्षांनंतर नियमित तपासणी करणे अत्यावश्यक आहे. केईएममधील या नव्या तंत्रज्ञानामुळे महिलांना दिलासा मिळण्यास मदत हाेणार असल्याचे केईएम रुग्णालयातील क्ष-किरण विभाग प्रमुख डॉ. हेमांगिनी ठक्कर यांनी सांगितले.