मुंबई : एकाच वेळी हृदयाच्या तीन प्रमुख रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे आणि माइट्रल व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात रक्ताची गळती अशा गुंतागुंतीच्या स्थितीचा सामना करणाऱ्या ८१ वर्षीय नारायण पाटील यांच्यावर सेठ जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय संलग्न केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी अल्प-हस्तक्षेपी उपचारपद्धतीच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करत त्यांना दिलासा दिला. अँजिओप्लास्टी आणि माइट्रल ट्रान्सकॅथेटर एज-टू-एज रिपेअर (एम-टीअर) या दोन प्रक्रियांचा नियोजनबद्ध वापर करण्यात आला. वाढते वय आणि शारीरिक अशक्तपणा यामुळे ओपन-हार्ट शस्त्रक्रिया धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने कॅथेटरच्या माध्यमातून रुग्णावर उपचार करण्यात आले.
सहा महिन्यांपासून नारायण पाटील यांना चालताना, जिना चढताना तसेच साधी दैनंदिन कामे करतानाही दम लागत होता. सुरुवातीला शारीरिक श्रम केल्यानंतर जाणवणारा हा त्रास हळूहळू वाढत गेला. थोडे वेगाने चालणे किंवा नेहमीची कामे करणेही त्यांच्यासाठी कष्टाचे झाले होते. या तक्रारीनंतर त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासण्यांनंतर त्यांची प्रकृती फंक्शनल क्लास २ या श्रेणीत असल्याचे स्पष्ट झाले. म्हणजेच, विश्रांतीच्या स्थितीत फारशी लक्षणे नसली तरी मध्यम स्वरूपाची शारीरिक हालचाल केल्यावर दम लागत असे. केईएम रुग्णालयातील कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. अजय महाजन यांच्या देखरेखीखाली पाटील यांच्या तपासण्या केल्या. टू डी इकोकार्डिओग्राफीमध्ये त्यांच्या हृदयाची पंपिंग क्षमता कमी झाल्याचे तसेच त्यांचा इजेक्शन फ्रॅक्शन सुमारे ४५ टक्के होता. त्याचबरोबर त्यांचे माइट्रल व्हॉल्व्ह व्यवस्थित बंद होत नसल्याने रक्त हृदयात गळती होत असल्याचे निदान झाले. माइट्रल व्हॉल्व्ह हा हृदयातील महत्त्वाची झडप असून, तो योग्य वेळी बंद झाल्यामुळे रक्ताचा प्रवाह पुढील दिशेने राहण्यास मदत होते. मात्र ही झडप व्यवस्थित बंद न झाल्यास हृदयाच्या पंपिंगच्या वेळी काही रक्त पुन्हा मागील दिशेने वळते. यातून हृदयावर अतिरिक्त ताण येऊन दम लागणे, थकवा तसेच शारीरिक क्षमता कमी होणे यांसारखी लक्षणे दिसतात.
उपचारानंतर रक्तगळती सौम्य पातळीवर
पाटील यांचा जोखीम गुणांक वाढलेला असल्याने ओपन-हार्ट शस्त्रक्रियेऐवजी कमी आक्रमक उपचारपद्धतीचा पर्याय निवडण्यात आला. उपचारामध्ये पायातील शिरेतून कॅथेटर हृदयापर्यंत नेला जातो. त्यानंतर विशेष क्लिप माइट्रल व्हॉल्व्हच्या गळती करणाऱ्या पत्रकांपर्यंत पोहोचवून त्यांना एकत्र पकडते. यामुळे माइट्रल व्हॉल्व्हमधून मागे जाणाऱ्या रक्ताचे प्रमाण कमी होते. या दोन्ही उपचारांनंतर इकोकार्डिओग्राफीमध्ये त्यांच्या माइट्रल रिगर्जिटेशनमध्ये लक्षणीय घट झाल्याचे आढळले. रक्ताची गळती उपचारानंतर सौम्य पातळीवर आली. त्यांच्या लक्षणांमध्येही सुधारणा झाली. ते रोजची कामे करू लागल्याची माहिती केईएम रुग्णालयातील कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. अजय महाजन यांनी दिली.
कुशल वैद्यकीय टीम आणि आधुनिक तंत्रज्ञानाची मदत
एम टीअर सारख्या आधुनिक अल्प-हस्तक्षेपी उपचारपद्धती तुलनेने जटिल आणि खर्चिक असून, फक्त खासगी रुग्णालयांमध्ये केल्या जातात. मात्र केईएम रुग्णालयामध्ये संपूर्ण उपचारपद्धती काळजीपूर्वक नियोजित करून, खर्चावर नियंत्रण ठेवत आणि उपचारांच्या गुणवत्तेशी तडजोड न करता पार पाडण्यात आली. योग्य नियोजन, कुशल वैद्यकीय टीम आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सरकारी रुग्णालयेही गरजू रुग्णांना जागतिक दर्जाची हृदयविकार सेवा देऊ शकतात, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरिष पाठक यांनी सांगितले.
