मुंबई : केईएम रुग्णालयात गुणवत्तापूर्ण व अत्याधुनिक स्वरूपाच्या आरोग्य सुविधांसाठी ‘हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम’ (एचएमआयएस) प्रणालीच्या प्रभावी अमलबजावणीसाठी सर्व विभागप्रमुखांनी प्रयत्न करावेत. तसेच या प्रणालीअंतर्गत उपलब्ध होणारी माहिती आणि डॅशबोर्डचा नियमितपणे आढावा घ्यावा. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा फायदा रुग्णांना कमी कालावधीत करून देण्यासाठी एचएमआयएस सेवेशी त्या संलग्न कराव्यात, अशा सूचना मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केईएम रुग्णालय प्रशासनाला दिल्या.
केईएम रुग्णालयातील विविध विभागांना आश्विनी भिडे यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, रुग्णालयातील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
रुग्णांच्या नोंदणी कक्षाच्या ठिकाणी ‘एचएमआयएस’ प्रणालीची कार्यपद्धती, वैद्यकीय तपासण्या, रुग्णांची माहिती, वैद्यकीय अहवाल, पुरूष रुग्ण कक्षात होणारी रूग्ण नोंदणी, कक्षातील उपचार आदी बाबींची एचएमआयएस प्रणालीमध्ये होणारी नोंद, अपघात विभाग, अतिदक्षता विभाग येथील सुविधांबाबतची माहिती आश्विनी भिडे यांनी जाणून घेतली. सद्यस्थितीत एचएमआयएस प्रणालीच्या अमलबजावणीअंतर्गत येणाऱ्या आव्हानांवर मात करून ही यंत्रणा अधिकाधिक रुग्णाभिमुख व्हावी यावर भर द्यावा, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध कराव्यात
विविध विभागांचे शस्त्रक्रिया कक्ष संकुल, रक्तचाचणी प्रयोगशाळा या एकाच ठिकाणी असल्याने रुग्णांची वेळेची बचत होईल. त्यादृष्टीने नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये नियोजन करावे. एमआरआय, सीटी स्कॅन यासारख्या चाचण्यांसाठी मोठ्या आणि अवजड उपकरणांच्या वापरासाठी भूमिगत कक्ष निर्माण करता येतील का, याचाही आढावा घ्यावा. शस्त्रक्रिया विभागाच्या ठिकाणी अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा ‘कॉर्पोरेट सामाजिक दायित्व’ (सी.एस.आर.) अंतर्गत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच रुग्णालय पुनर्विकासअंतर्गत उपलब्ध जागेचा अधिकाधिक वापर होईल, यादृष्टीने आराखडा तयार करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
रुग्णालयाच्या महसूल वाढीसाठी प्रयत्न करावेत
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना, अपघातग्रस्तांसाठी ‘पीएम-राहत’ योजना यासारख्या योजनांचा लाभ रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना करून द्यावा. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या धर्तीवर इतर योजनांसाठी वैद्यकीय उपचारांसाठी शुल्क आकारणी करावी. त्याचा फायदा रुग्णालयाच्या महसूल वाढीसाठी कसा होईल, त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशा सूचनाही दिल्या.
प्राथमिक उपचारांचा ताण कमी करण्यासाठी नियोजन करा
केईएम रुग्णालयावर आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी येणारा ताण पाहता नजीकच्या दवाखान्यात वैद्यकीय सुविधा उपलब्ध कराव्या. केईएम रुग्णालयाने नजीकच्या दवाखान्यांच्या ठिकाणी आरोग्य सुविधांसाठीचे रुग्ण पाठवावेत, त्यामुळे प्राथमिक सेवेवर येणारा ताण कमी होईल, अशा सूचना भिडे यांनी दिल्या. आरोग्य सेवांसाठी उपनगरीय रुग्णालये, प्रसूतीगृह आणि दवाखान्यांत अधिक सेवा – सुविधा उपलब्ध कराव्या, असे निर्देशही त्यांनी दिले.
