मुंबई : परळ येथील मुंबई महापालिकेच्या किंग एडवर्ड स्मारक रुग्णालय अर्थात ‘केईएम’ (KEM)चे नाव आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ असे करण्यास पालिकेच्या आरोग्य समितीने मंजुरी दिली आहे. मात्र, या निर्णयाला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. विरोधकांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ सोमवारी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि आमदार अजय चौधरी यांनी केईएमच्या अधिष्ठाता संगीता रावत यांची भेट घेतली. तसेच, आंदोलन करून विरोध दर्शवला.
केईएम रुग्णालय आपल्या उत्तम आणि सर्वसमावेशक आरोग्य सुविधांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांनी या रुग्णालयाचे नाव बदलण्याचा घाट घातल्याने केईएम रुग्णालय चांगलेच चर्चेत आले आहे. रुग्णालयाचे मूळ नाव बदलण्यास शिवसेना (ठाकरे) पक्षाने विरोध दर्शवला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही या निर्णयावर टीका केली जात आहे.
रुग्णालयाचे नाव बदलण्याचे पत्र मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांना दिले होते. हे पत्र त्यांनी गेल्या आठवड्यात आरोग्य समितीच्या पटलावर ठेवले आणि गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत या पत्राला मंजुरी देण्यात आली. नामांतराचा ठराव मंजूर करून अभिप्रायासाठी मुंबई महापालिका प्रशासनाकडे सादर केला आहे. नामांतराचा ठराव मंजूर झाल्यानंतर आता त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने या नामांतराला विरोध दर्शवला आहे. नुकतेच शिवसेनेच्या (ठाकरे) वतीने या नामांतर निर्णयाविरोधात निदर्शने करण्यात आली.
मंगलप्रभात लोढा यांनी यापूर्वीही रुग्णालयाचे नाव बदलण्याबाबत प्रशासनाला पत्र पाठविले होते. मात्र, त्यावर ठोस निर्णय झाला नव्हता. रुग्णालयात उत्तमोत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी नामांतराचा अट्टाहास का, असाही प्रश्न मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे.
स्वतःच्या टॉवरमध्ये रुग्णालय सुरू करावे
या रूग्णालयाला ऐतिहासिक महत्व असून जागतिक दर्जाचे डॉक्टर या रूग्णालयातून शिकून मोठे झाले आहेत. जगभरात के. ई. एम. रूग्णालय (परळ) अशीच या रूग्णालयाची ओळख आहे. अशा या रूग्णालयाचे नाव बदलून ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रूग्णालय’ असे नाव देण्याच्या प्रस्तावाला आमचा विरोध आहे. मुंबईत जे टोलेजंग टॉवर बांधत आहात त्यातील एका टॉवरमध्ये एखादे धर्मादाय रूग्णालय बांधावे व त्याचे नाव आपण सुचविल्याप्रमाणे द्यावे, असा टोला आमदार अजय चौधरी यांनी मंगलप्रभात लोढा यांना लगावला आहे.
लोढा यांचा दुटप्पीपणा
लोढा यांच्या कंपनीच्यावतीने मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे टॉवर उभारण्यात आले असून संबंधित टॉवरला त्यांनी इंग्रजी नाव दिले आहे. उदा. १८६५ च्या सुमारास मुंबई येथील वाळकेश्वर या ठिकाणी इंग्रज अधिकारी कर्नल अल्टा गाऊंट राहत होते. त्यामुळे त्या रस्त्याला अल्टा माऊंट रोड असे नाव देण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकेने पूर्वीचे नाव असलेल्या अल्टा माऊंट रोडला एप्स. के. बडोदावाला मार्ग असे नाव दिले आहे. त्याच परिसरात मंगलप्रभात लोढा यांनी बांधलेल्या टॉवरला लोढा अल्टा माऊंट टॉवर असे नाव दिले आहे.
म्हणजेच एका ठिकाणी रुग्णलायाचे इंग्रजी नाव बदलण्याचा अट्टाहास करायचा व दुस-या ठिकाणी आपल्या टॉवरला इंग्रजी अधिका-याचे नाव दयायचे. यातून लोढा यांचा दुटप्पीपणा समजतो, असे नगरसेवक सचिन पडवळ म्हणाले.
के.ई.एम रुगालयाचे हे शताब्दी वर्ष असून या शताब्दी वर्षांमध्ये नागरिकांना जास्तीत जास्त आय.सी.यु बेड उपलब्ध करणे, रुग्णांसाठी विविध सेवा उपलब्ध करणे हे मुंबईकर नागरिकांना अपेक्षित आहे. त्यामुळे नामांतराचा निर्णय प्रशासनाने रद्द करावा, अशी मागणी पडवळ यांनी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे.
