मुंबई : जन्मत: कर्णदोष असलेल्या आठ वर्षांच्या मुलावर केईएम रुग्णालयात जगातील अत्याधुनिक ‘स्मार्ट कॉक्लिअर इम्प्लांट’ यशस्वीपणे बसवण्यात आले. अत्याधुनिक श्रवण उपकरण मिळवणारा मुंबईतील सार्वजनिक रुग्णालयातील हा पहिला बालरुग्ण ठरला आहे. हे अत्याधुनिक श्रवण उपकरण मोबाइलप्रमाणे अपग्रेड करता येते. त्यामुळे भविष्यात त्याला नवीन तंत्रज्ञानासाठी पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची गरज भासणार नाही. हे तंत्रज्ञान बालकांसाठी वरदान ठरले आहे.

वरळी येथे राहणाऱ्या धनश्री पाटील यांचा मुलगा रुद्रांश याला दोन वर्षांचा असताना ऐकण्यास अडचण येत असल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. त्याच्याशी बोलताना मोठ्याने बोलावे लागत होते. त्यामुळे त्याला केईएम रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले. उपचारादरम्यान त्याला जन्मत: कर्णदोष असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी रुद्रांशवर कॉक्लिअर इम्प्लांटची शस्त्रक्रिया करण्याचे पाटील कुटुंबियाना सुचवले. कॉक्लिअर इम्प्लांटचा खर्च लक्षात घेत पाटील कुटुंबीयांनी मध्यम श्रेणीतील इम्प्लांटचा विचार केला होता. मात्र अत्याधुनिक ‘स्मार्ट कॉक्लिअर इम्प्लांट’ हे नवीन उपकरण मोबाइलप्रमाणे अपग्रेड करता येते आणि भविष्यात नवीन तंत्रज्ञानासाठी पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची गरज भासत नाही, हे समजल्यावर त्यांनी हा पर्याय निवडला. तसेच या नवीन तंत्रज्ञानामुळे त्याला सीटी स्कॅन आणि थ्री टेस्ला एमआरआय तपासण्यांशी संबंधित काही अडचणी येणार नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यानंतर पाटील कुटुंबीयांनी अत्याधुनिक ‘स्मार्ट कॉक्लिअर इम्प्लांट’ बसविण्याचा निर्णय घेतला.

केईएम रुग्णालयातील ईएनटी विभागप्रमुख डॉ. हेतल मार्फातिया यांच्या नेतृत्वाखाली २९ मे रोजी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतरची जखम भरताच डॉक्टर ‘बाह्य साउंड प्रोसेसर’ सुरू करतील आणि श्रवण पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे रुद्रांशला अधिक स्पष्टपणे आवाज ऐकू येण्यास मदत होणार आहे. अशा प्रकारच्या महागड्या शस्त्रक्रिया सामान्यतः खासगी रुग्णालयांमध्ये केल्या जातात. मात्र गेल्या दहा वर्षांत ७०० हून अधिक कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्याच्या अनुभवामुळे केईएम रुग्णालयाची निवड करण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या इम्प्लांटसाठी लागणारे २१ लाख रुपये रुद्रांशच्या कुटुंबीय, मित्र-नातेवाईक आणि बीएमसी रुग्णालयाशी संबंधित देणगीदारांच्या मदतीतून उभे करण्यात आले.

या शस्त्रक्रियेमुळे रुद्रांश मुंबईतील सार्वजनिक रुग्णालयात सर्वात आधुनिक ‘कृत्रिम श्रवणयंत्र’ मिळवणारा पहिला रुग्ण ठरला आहे. हे उपकरण भविष्यातील श्रवण तंत्रज्ञानाशी सुसंगत राहील, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

अत्याधुनिक इम्प्लांटचे वैशिष्ट्य

या नवीन तंत्रज्ञानातील चिप भविष्यात अपग्रेड करता येते. पारंपरिक कॉक्लिअर इम्प्लांटमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागू शकते. मात्र या नवीन ‘ नेक्सा ‘ प्रणालीमध्ये शरीरात बसवलेले उपकरण बदलण्याची गरज नसून केवळ सॉफ्टवेअर अपडेटद्वारे नवीन सुविधा मिळू शकतात, असे कान, नाक, घसा विभागाच्या प्रमुख डॉ. हेतल मार्फातिया यांनी सांगितले.