गेल्या ४२ वर्षांपासून कोमामध्ये असलेलेल्या केईएम रुग्णालयातील परिचारिका अरुणा शानबाग यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे. गेल्या काही दिवसांपासून अरुणा यांची तब्येत ठीक नव्हती. तसेच, त्यांचा मृत्यू झाल्याची अफवाही शनिवारपासून सर्वत्र फिरत आहे. मात्र, आता त्या व्यवस्थित असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.  त्या उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.
चार दिवसांपूर्वी अरुणा यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. या वेळी त्यांच्या काही चाचण्या केल्यावर त्यांना न्युमोनिया झाल्याचे निदान झाले. त्यांच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण होऊ नये, म्हणून त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते.
१९७३ मध्ये केईएम रुग्णालयात वॉर्डबॉयने केलेल्या हल्ल्यानंतर अरुणा शानबाग कोमामध्ये गेल्या आहेत. गेली चाळीस वर्षे त्यांच्यावर केईएममध्ये उपचार सुरू आहेत. दरवर्षी त्यांचा वाढदिवसही साजरा केला जातो. काही वेळा त्यांच्या प्रकृतीत चढउतार होतात. मात्र केईएमच्या परिचारिकांनी त्यांचा सांभाळ केला. तब्बल ३७ वर्षे कोमात असलेल्या अरुणा यांना दयामरण द्यावे, अशी याचिका पत्रकार पिंकी विराणी यांनी २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयात केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती़.