मुंबई : परिचारिकेला मारहाण करणाऱ्या दोषींवर कारवाई करून त्यांना अटक व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उपमहापौर संजय घाडी यांनी केईएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना दिले. तसेच डॉक्टर, परिचारिका व रुग्णालयातील कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या मुद्यांवरील अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
परळ येथील केईएम रुग्णालयात परिचारिकेला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर उपमहापौर संजय घाडी यांनी रुग्णालयाला बुधवारी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेबाबत महापौर व आरोग्य समिती अध्यक्ष यांच्याशी चर्चा करण्यात येईल. तसेच सर्व आरोपींविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे घाडी यांनी यावेळी सांगितले. तसेच डॉक्टर, परिचारिका यांच्याशी संबंधित सुरक्षेच्या मुद्यांवरील अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे घाडी यांनी सांगितले.
रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या परिचारिकेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर उपमहापौरांनी सदर परिचारिकेची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, रुग्णालयातील अन्य डॉक्टर व कर्मचारी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरावी
मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. उपलब्ध कर्मचाऱ्यांना रुग्णसेवा पुरविताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांतील रिक्त पदे तातडीने भरवी. प्रत्येक रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे निराकरण करण्यासाठी यंत्रणा निर्माण करावी, असे निर्देश त्यांनी दिले
रुग्णालयांना भेट देणार
स्वच्छता, औषधांची उपलब्धता आणि एकूणच रुग्णालय व्यवस्थापन सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध रुग्णालयांना भेट देणार असून आयुक्तांबरोबर चर्चा करून विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
