मुंबई : परळ येथील मुंबई महापालिकेचे किंग एडवर्ड स्मारक रुग्णालय अर्थात केईएम रुग्णालय हे लवकरच आता वेगळ्या नावाने ओळखले जाणार आहे. या रुग्णालयाचे ””कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय”” असे नामकरण करावे असे पत्र कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आरोग्य समितीला दिले होते. हे पत्र आरोग्य समितीच्या पटलावर ठेवण्यात आले असून शुक्रवारी याबाबतचा ठराव समितीने मंजूर केला. आता हा ठराव अभिप्रायासाठी प्रशासनाकडे पाठवण्यात येणार आहे. रुग्णालयाचे नाव बदलेले असले तरी त्याचे संक्षिप्त स्वरुप केईएम असेच राहणार आहे. स्वदेशी नावांच्या अट्टाहासामुळे केईएमचेही नामकरण करण्यात येणार आहे.

परळ यथे मुंबई महापालिकेचे केईएम हे १०० वर्षे जुने रुग्णालय आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्ण येतात. २२ जानेवारी १९२६ रोजी केईएम रुग्णालय स्थापन करण्यात आले. त्यानंतर आता १०० वर्षे जुन्या केईएम रुग्णालयाचे नाव बदलले जाणार आहे. रुग्णालयाचे नाव बदलण्याचे पत्र मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांना दिले होते. हे पत्र त्यांनी आरोग्य समितीच्या पटलावर ठेवले असून शुक्रवारी झालेल्या बैठकीत या पत्राला मंजूरी देण्यात आली आहे. नामांतराचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. आता प्रस्ताव अभिप्रायासाठी मुंबई महापालिका प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याचे आरोग्य समिती अध्यक्ष हरिश भांदिर्गे यांनी सांगितले.

काय म्हटले आहे प्रस्तावात … ””स्वदेशी”” या प्रेरणादायी संकल्पनेच्या प्रभावाखाली आपला देश समृध्द स्वदेशी वारसा पुनर्प्रस्थापित आणि गौरव करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, यादृष्टीने सार्वजनिक संस्थांच्या परकीय नावांचे पुनर्नामकरण करणे आवश्यक आहे. आजमितीपर्यंत अनेक संस्था वसाहतवादी काळातील नावाचा वापर करीत आहे जे दास्याच्या काळाची आठवण करून देतात. या वास्तुंना देण्यात येणाऱ्या नावांची जागा ही आपली संस्कृती, मुल्ये आणि प्रेरणादायी इतिहास जपण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक व्यक्तींना सन्मान देणाऱ्या नावांनी घेतली पाहिजे.

यासाठी किंग एडवर्ड मेमोरियल (के.ई.एम.) रुग्णालय या मुंबईतील संस्थेचे पुनर्नामकरण झाल्यास भारतीय इतिहास आणि संस्कृतीतून निवडलेले नाव भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देत राहणार आहे. त्यामुळे केईएम रुग्णालयाचे नाव ””कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय”” करण्यात यावे, असे पत्र मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आरोग्य समिती अध्यक्षांना २९ मार्च २०२६ रोजी लिहिले होते.

स्वदेशीचा अट्टाहासदेशातील सार्वजनिक संस्थांच्या परकीय नावांचे पुनर्नामकरण करण्याचे स्वदेशीचे धोरण भाजपने स्वीकारले आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या कर्नाक पूलाचे सिंदूर असे नामकरण करण्यात आले. तसेच मुंबई सेंट्रलच्या बेलासिस पुलाचे अहिल्याबाई होळकर नामकरण करण्यात आले होते. त्याच अंतर्गत आता केईएम रुग्णालयाचे नामकरण ””कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय”” असे करण्यात आले आहे. मात्र केईएमचे नाव बदलताना त्याचे संक्षिप्त रुप तसेच राहील याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.