मुंबई : परळ येथील मुंबई महापालिकेच्या किंग एडवर्ड स्मारक रुग्णालय अर्थात केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास शिवसेना (ठाकरे) पक्षाने विरोध दर्शवला आहे. सोमवारी शिवडी विधानसभेच्यावतीने केईएम रुग्णालयात निदर्शने करण्यात येणार आहेत. येत्या काळात केईएमच्या नामांतराचा विषय तापणार असून त्यावरून ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजपला घेरण्याचे ठरवले आहे.

परळ येथे मुंबई महापालिकेचे केईएम हे १०० वर्षे जुने रुग्णालय आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्ण येतात. २२ जानेवारी १९२६ रोजी केईएम रुग्णालय स्थापन करण्यात आले. त्यानंतर आता १०० वर्षे जुन्या केईएम रुग्णालयाचे नाव बदलले जाणार आहे. रुग्णालयाचे नाव बदलण्याचे पत्र मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांना दिले होते. हे पत्र त्यांनी गेल्या आठवड्यात आरोग्य समितीच्या पटलावर ठेवले आणि गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत या प्रत्राला मंजूरी देण्यात आली.

नामांतराचा ठराव मंजूर करून अभिप्रायासाठी मुंबई महापालिका प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. नामांतराचा ठराव मंजूर झाल्यानंतर आता त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने या नामांतराला विरोध दर्शवला असताना आता शिवसेना (ठाकरे) पक्षानेही या निर्णयाला विरोध केला आहे.

केईएम रुग्णालय हे शिवडी विधानसभेच्या हद्दीत येते. शिवडी विधानसभा मतदारसंघ शिवसेना (ठाकरे) पक्षाचा बालेकिल्ला असून सोमवारी केईएम रुग्णालयाच्या परिसरात मंत्री लोढा यांच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाने या आंदोलनाची माहिती समाजमाध्यमावरून दिली आहे.

केईएम रुग्णालय हे १०० वर्षे जुने रुग्णालय असून या रुग्णालयाचे नाव बदलणे ही साधी गोष्ट नाही. या रुग्णालयाचे नाव बदलण्यापूर्वी तज्ज्ञ व्यक्तींशी, डॉक्टरांशी, सेवानिवृत्त झालेल्या डॉक्टरांशी चर्चा करणे आवश्यक होते. मात्र परस्पर एका पत्राद्वारे नाव बदलण्याचा ठराव मंजूर करणे योग्य नाही असे मत शिवडीतील नगरसेवक सचिन पडवळ यांनी व्यक्त केले आहे.

देशातील सार्वजनिक संस्थांच्या परकीय नावांचे पुनर्नामकरण करण्याचे स्वदेशीचे धोरण भाजपने स्वीकारले आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या कर्नाक पूलाचे सिंदूर असे नामकरण करण्यात आले. तसेच मुंबई सेंट्रलच्या बेलासिस पुलाचे अहिल्याबाई होळकर नामकरण करण्यात आले होते. त्याच अंतर्गत आता केईएम रुग्णालयाचे नामकरण ”कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय” असे करण्यात आले आहे. मात्र केईएम चे नाव बदलताना त्याचे संक्षिप्त रुप तसेच राहील याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. मात्र नामांतराला आता विरोध होऊ लागला आहे.