रखडलेले वेतन बँक खात्यावर लवकरच जमा करण्याचे आश्वासन

संगणकीय हजेरीपटातील त्रुटीमुळे रखडलेले किंवा कापलेले वेतन तातडीने देण्यात यावे यासाठी पालिका रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी केईएमच्या आवारात गुरुवारी दुपारी आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत पालिकेने गुरुवारी रखडलेले वेतन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले असल्याने सध्या तरी हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

पालिकेच्या विभागीय आस्थापना अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेळा संगणकीय हजेरीपटात भरल्या नसल्याने पालिका रुग्णालयातील बहुतांश कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन मार्च महिना आले तरी झालेले नव्हते, तर काही कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्येही कपात करण्यात आली होती. ऐन होळीच्या सणामध्ये वेतन न मिळाल्याने संतप्त झालेल्या कामगार संघटनांनी याबाबत पालिकेशी वेळोवेळी पत्रव्यवहाराद्वारे वेतनप्रश्न निदर्शनास आणला होता. परंतु पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी अखेर बुधवारपासून आंदोलने करण्यास सुरुवात केली. बुधवारच्या झालेल्या केईएममधील दोन तास काम बंद आंदोलनाच्या संपानंतर गुरुवारी सर्व पालिका रुग्णालयांचे कर्मचारी दुपारी केईएमच्या आवारामध्ये आंदोलनासाठी जमले होते. यामध्ये सुमारे ७०० परिचारिकांसह पालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणा देत थकविलेले वेतन तात्काळ काढण्याची मागणी केली. संगणकीय हजेरी पटातल्या त्रुटी कर्मचाऱ्यांनी यावेळी मांडताना हजेरी लावण्यासाठी रोज १५ ते २० मिनिटे रांगेत उभे राहावे लागते. यामुळेही बऱ्याचदा वेळेत येऊनही संगणकीय हजेरीपटावर हजेरी मात्र वेळेत नोंदवली जात नाही, असे कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.नायर रुग्णालयामध्ये ही रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.रमेश भारमल यांच्या कार्यालयासमोर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सुमारे तासभर निदर्शने केली. त्यानंतर त्यांनी संगणकीय हजेरीपटाबाबतच्या अडचणी डॉ. भारमल यांच्यासमोर मांडल्या.

दोन दिवसांत कार्यवाही

कर्मचाऱ्यांनी संगणकीय हजेरीपटात कामाच्या तासांनुसार वेळा न भरणे, नैमित्तिक रजा कापल्या जाणे, तसेच यंत्रातील त्रुटीमुळे हजेरी लावण्यास उशीर होणे आदी मागण्यांबाबत चर्चा केली. त्यानुसार एक अहवाल तयार केला गेला असून कर्मचाऱ्यांच्या या सर्व मागण्या संचालक डॉ. अविनाश सुपे यांना देण्यात येणार असल्याचे, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. पालिकेने बुधवारपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत रखडलेले वेतन गुरुवारी काढले. ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली होती, तेही पुढील दोन दिवसांत दिले जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले, म्युन्सिपल कामगार सेनेचे कार्यवाहक सुनील चिटणीस यांनी सांगितले. तसेच कर्मचाऱ्यांच्या ९० टक्के मागण्या या पालिकेने मान्य केल्या असल्याने आंदोलन मागे घेण्यात आले असल्याचे चिटणीस यांनी सांगितले.