मुंबई : मुंबई महापालिकेच्या केईएम, शीव, नायर रुग्णालयांमधील हृदयरोग विभागासाठी पाच अत्याधुनिक ‘ॲडव्हान्स्ड डिजिटल फोर डी इकोकार्डिओग्राफी’ आणि ‘कलर डॉप्लर’ यंत्रणा उपलब्ध करण्यात येत आहे. या यंत्रणामुळे हृदयाच्या झडपांचे आजार, जन्माजात असणारे हृदयाचे दोष आणि हृदयाचे पंपिंग अचूकपणे मोजणे शक्य होणार आहे. तसेच या यंत्रणामुळे उपलब्ध होणाऱ्या ‘फोर डी’ प्रतिमांमुळे डॉक्टरांना हृदयांच्या शस्त्रक्रियांबाबत अचूक निर्णय घेण्यास मदत होणार आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता सर्वसामान्य रुग्णांना अत्यंत वाजवी दरात हृदयविकाराचे अचूक आणि प्रगत निदान मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये तीन, शीव व नायर रुग्णालयामध्ये प्रत्येकी एक अशा पाच ‘फोर डी’ यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. जीई हेल्थकेअर या कंपनीकडून हे यंत्र खरेदी करण्यात येणार आहे. एका यंत्राची किंमत १ कोटी ३६ लाख ४५५ रुपये असून, पाच यंत्रांसाठी एकूण खर्च ६ कोटी ८० लाख २ हजार २७५ रुपये आहे. या पाच यंत्रणांच्या खरेदीसह तीन वर्षांची वॉरंटी आणि त्यानंतर सात वर्षांच्या सर्वसमावेशक देखभाल करारासाठी म्हणजेच १४ डिसेंबर २०३५ पर्यंत (सीएमसी) एकूण सुमारे ९ कोटी ७८ लाख ९६ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
सात वर्षांच्या देखभालीसाठी २.८९ कोटी
तीन वर्षांची वॉरंटी संपल्यानंतर पुढील सात वर्षांसाठी सर्वसमावेशक देखभाल करार करण्यात येणार आहे. प्रत्येक यंत्रणेसाठी दरवर्षी ८ लाख २६ हजार १५१ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. सात वर्षांसाठी पाच यंत्रणांचा एकूण सीएमसी खर्च २ कोटी ८९ लाख १५ हजार ३१३ रुपये इतका आहे.
ब्रेकडाऊननंतर ७२ तासांत सेवा
प्रतिबंधात्मक देखभालीसाठी वर्षातून चार सेवा भेटी करणे आवश्यक आहे. ब्रेकडाऊनची तक्रार नोंदवल्यानंतर ७२ तासांच्या आत सेवा अभियंत्याने घटनास्थळी पोहोचणे आवश्यक आहे. उपकरणाची दुरुस्ती १२० तासांत झाली नाही, तर देयकातून विलंबाच्या कालावधीसाठी दुप्पट प्रमाणात दैनंदिन शुल्क कपात करण्याची तरतूद आहे. उपकरण दुरुस्तीसाठी सेवा केंद्रात नेण्याची आवश्यकता असल्यास अतिरिक्त सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरही उपकरण उपलब्ध करून न दिल्यास अतिरिक्त कपातीची तरतूद करण्यात आली आहे.
