मुंबई : गणेशोत्सवानिमित्त गावी जाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. त्यातच मुंबई विभागातील केंद्रीय विद्यालयाने १८ सप्टेंबरपासून इयत्ता सहावी ते आठवीची परीक्षा जाहीर केली आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करायचा की परीक्षेची तयारी कारायची, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. तर ऐन गणेशोत्सवामध्ये परीक्षा आल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
राज्यात १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यात होणार आहे. गौरी गणपतीचे विसर्जन १९ सप्टेंबरला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांना १४ ते २० सप्टेंबरदरम्यान सुटी जाहीर करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात विद्यार्थी आणि पालक व्यस्त असतानाच केंद्रीय विद्यालयाने मुंबई विभागातील शाळांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांची दुसरी घटक चाचणी, बारावीची मासिक चाचणी २१ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. तर इयत्ता सहावी ते आठवीची सहामाही परीक्षा १८ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. इयत्ता सहावी आणि आठवीचा १८ सप्टेंबर रोजी ‘सीटी आणि एआय’ आणि १९ सप्टेंबरला ‘जर्मन’ या विषयाची परीक्षा होणार आहे. गणेशोत्सवादरम्यान परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे, तसेच उत्सवातील सहभागाचे नियोजन पालकांना करावे लागणार आहे.
नियोजन बिघडल्याने पालक चिंतेत
सुरुवातीला पाठवलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा २१ सप्टेंबरपासून सुरू होत होती. त्यामुळे आम्ही गणेशोत्सवाचे नियोजन केले होते.मात्र त्यानंतर परीक्षा १८ सप्टेंबरपासून सुरू होत असल्याचा लघुसंदेश आला. त्यामुळे आमचे गणेशोत्सवाचे संपूर्ण नियोजन बिघडले, असे पवई येथील केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या पालकाने सांगितले. गतवर्षीही केंद्रीय विद्यालयाकडून गणेशोत्सव काळात परीक्षा ठेवण्यात आली होती. त्याला पालकांकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. मात्र यावेळीही केंद्रीय विद्यालयाने ऐन गणेशोत्सवात परीक्षेचा घाट घातल्याचे कांजूरमार्ग येथील केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीच्या पालकाने सांगितले.
