मुंबई : सर्व देशाचे लक्ष केरळमध्ये मान्सून केव्हा दाखल होतो याकडे लागले आहे. दरम्यान, मान्सूनच्या केरळमधील आगमनाविषयी भारतीय हवामानशास्त्र विभागाने नवी तारीख मंगळवारी जाहीर केली. याआधी हवामान विभागाने २६ मेच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये दाखल झाला नाही. सध्या मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे, अशीही माहिती हवामान विभागाने दिली आहे.

मान्सूनचे आगमन लांबल्याने उष्णतेचा सामना करणाऱ्या नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. राज्यात अनेक भागात पूर्व मान्सून सक्रिय झाला असला तरीही काही भागात उकाडा कायम आहे. तसेच काही भागात कमाल तापमानात काहीशी घट झाली असली तरीही उन्हाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. वादळी पावसामुळे केवळ काही काळ नागरिकांना गारवा अनुभवयाला मिळत आहे. यात केरळमध्ये मान्सूनचे आगमन काहीसे लांबले आहे. दरम्यान, हवामान विभागाने केरळ येथे मान्सून दाखल होण्याची नवी तारीख मंगळवारी जाहीर केली.

केरळमध्ये मान्सूनचे आगमन कधी ?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुरुवार, ४ जून रोजी केरळ येथे मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. यामुळे लवकरच मान्सूनच्या पुढील वाटचालींना वेग येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच पुढील ६ ते ७ दिवसात केरळमधील विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच तामिळनाडू, कर्नाटक येथील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान विभगाने व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार, ४ जूनच्या आसपास नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल आग्नेय अरबी समुद्रातील काही भाग, लक्ष्यद्वीप समूह, केरळ आणि तामिळनाडूमधील काही भाग, तसेच बंगालच्या उपसागरात होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. यामुळे पुढील काही दिवसात या सर्व प्रदेशात मान्सूनचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. मान्सून गुरुवारी केरळमध्ये दाखल झाल्यास आणि अनुकूल स्थिती असल्यास लवकरच मान्सून महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर दाखल होण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांवर वादळी पावसाचा प्रभाव आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे. तर उत्तर कोकणातील काही भागात उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद होत आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून बुधवारसाठी राज्यातील बहुतांश भागांना वादळी पावसासाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर काही भागात हवामान कोरडे राहणार आहे.