मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत समाजमाध्यमावरून आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी कळवा पोलिसांनी केलेली अटक बेकायदा ठरवण्याच्या मागणीसाठी सध्या अटकेत असलेली अभिनेत्री केतकी चितळे हिने उच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे. केतकीला कळवा पोलिसांनी १४ मे रोजी अटक केली होती. यापूर्वी तिने गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी याचिका केली असून ती प्रलंबित आहे. आधीच्या याचिकेत केतकीने जामिनावर सुटका करण्याची मागणीही केली होती. नव्या याचिकेत तिने कळवा पोलिसांनी केलेली अटक बेकायदा ठरवण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अटक करण्याबाबत घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पोलिसांनी उल्लंघन केल्याचा दावाही केतकीने केला. अटकेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आपल्यावर हल्ला करण्यास पोलिसांनी परवानगी दिली. या कार्यकर्त्यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप केतकीने याचिकेत केला आहे. बदनामी करणे, धर्म आणि वंशाच्या आधारे विविध समाजांमध्ये शत्रुत्व वाढवणे या आरोपांतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘अ‍ॅट्रॉसिटी’ प्रकरणात जामीन 

ठाणे : आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी अटकेत असलेली दुय्यम नटी केतकी चितळे हिला ठाणे न्यायालयाने गुरुवारी ‘अ‍ॅट्रॉसिटी’प्रकरणी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. २०२० मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर समाजमाध्यमावर हिणकस लिखाण केल्याप्रकरणी केतकी हिला ठाणे पोलिसांनी अटक केली होती. तिला या प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळताच रबाळे पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (अ‍ॅट्रॉसिटी) तिचा ताबा घेतला होता. तिच्या विरोधात २०२० मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात नवबौद्धांविषयी समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. तिला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर तिचे वकिल वसंत बनसोडे यांच्या मार्फत जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. सुमारे दोन आठवडय़ांपूर्वी या जामीन अर्जावर ठाणे न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला होता. त्या वेळी न्यायाधीशांनी निर्णय राखून ठेवला होता.

पोलीस महासंचालकांना नोटीस

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात समाज माध्यमावर पोस्ट प्रसारित केल्याच्या आरोपाखाली मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला अटक केली. मात्र, पवार यांचे नाव न लिहिता मानहानी प्रकरणाची नोंद कशाप्रकारे करण्यात आली, असा प्रश्न केंद्रीय महिला आयोगाने उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकरणी केंद्रीय महिला आयोगाने राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना नोटीस बजावली आहे. तसेच पोलीस महासंचालकांना १७ जून रोजी आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता एक वादग्रस्त पोस्ट टाकली. त्यानंतर केतकी चितळेविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले.

केतकी चितळेने आपली अटक बेकायदा असल्याचा दावा करत उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र आता या प्रकरणाची दखल केंद्रीय महिला आयोगानेही घेतली आहे. केतकीने तिच्या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नव्हते, उलट तिने सामान्य टिप्पणी केली होती, असे बातम्यांच्या आधाराने आयोगाने म्हटले आहे. केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांना पत्र लिहून केतकीने तिच्या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केलेला नसतानाही या प्रकरणात मानहानीची तरतूद केल्याबद्दल सात दिवसांच्या आत स्पष्टीकरण मागितले आहे.