स्वतःवरील सेंटलमेंटचे आरोप फेटाळून लावताना विधानसभेतील विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी आरोपांची विधिमंडळाच्या समितीकडून चौकशी आपण तयार असल्याचे म्हटले आहे.
एकनाथ खडसे सकाळी विधानसभेत प्रश्न उपस्थित करतात आणि संध्याकाळी सरकारबरोबर सेटलमेंट करतात, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्याचा खरपूस समाचार खडसे यांनी सोमवारी घेतला होता. सेटलमेंट केली असती, तर कोहिनूर मिल माझ्या नावावर झाल असती, चार-दोन परदेशी गाड्या माझ्याकडे आल्या असत्या, असे प्रत्युत्तर खडेस यांनी दिले होते. मंगळवारी त्यांनी आपण विधिमंडळाच्या समितीकडून चौकशीस तयार असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खडसेंवरील आरोप म्हणजे सभागृहाच्या कार्यपद्धतीवरच आरोप करण्यासारखे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर उत्तर देताना खडसे यांनीदेखील आपण विधिमंडळ समितीच्या चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहोत, असे म्हटले आहे. चौकशी समितीमध्ये सर्व पक्षांचे आमदार असावेत, असेही त्यांनी म्हटले आहे. चौकशी केल्यानंतर माझ्यावर करण्यात आलेले आरोप खरे की खोटे हे बाहेर येईलच. बिल्डरांवर सभागृहात प्रश्न उपस्थित केल्यामुळेच मला बदनाम करण्याचा कट रचण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सभागृहात मी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्याची प्रत मुख्यमंत्र्यांकडे आणि केंद्रीय दक्षता आयोगाकडे देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.