मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार जळगावपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जळगाव – छत्रपती संभाजीनगर खानदेश द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. या महामार्गाचे संरेखन एमएसआरडीसीने निश्चित केले असून संरेखनाचा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार हा महामार्ग १२२.६०० किमीचा असणार असून यासाठी १०,९३१.३६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग सेवेत दाखल झाल्यास जळगाव – छत्रपती संभाजीनगर अंतर सव्वातीन तासांऐवजी केवळ एका तासात पार करता येणार आहे.
समृद्धी महामार्ग १० जिल्ह्यांना थेट जोडत असून या महामार्गामुळे या जिल्ह्यांत अतिजलद पोहोचता येते. आता हा महामार्ग राज्यातील अधिकाधिक जिल्ह्यांशी जोडला जावा यासाठी महामार्गाचा विविध ठिकाणी विस्तार करण्यात येत आहे. जालना – नांदेड, नागपूर – चंद्रपूर, नागपूर – गोंदिया, भंडारा – गडचिरोली असा विस्तार केला जात आहे.
देशातील सर्वात मोठे वाढवण बंदरही समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी वाढवण – तवा आणि तवा – भरवीर असा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येत आहे. आता समृद्धी महामार्ग जळगावपर्यंत नेण्यात येणार आहे. यासाठी जळगाव – छत्रपती संभाजीनगर द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. हा महामार्ग अंदाजे १०५ किमी लांबीचा असेल, असे म्हटले जात होते. पण हा महामार्ग १२२.६०० किमीचा असणार आहे.
मेसर्स मोनार्च या सल्लागार कंपनीने अभ्यास करून संरेखनाचे तीन पर्याय सादर केले होते. त्यानुसार तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या तिन्ही पर्यायांचा तुलनात्मक अभ्यास किफायतशीर असा संरेखनाचा एक पर्याय निश्चित करण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. निश्चित संरेखनानुसार हा महामार्ग आता १२२.६०० किमी लांबीचा आणि सहा पदरी असणार आहे. प्रवेश-नियंत्रित आणि ताशी १५० किमी अशी संकल्पित वेगमर्यादा या महामार्गाची असणार आहे. या प्रकल्पासाठी १०,९३१.३६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महामार्गासाठी १,२५०.८४ हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे. छत्रपती संभाजीनगर – जळगाव अंतर १५६ किमी इतके असून ते अंतर पार करण्यासाठी तीन तास २० मिनिटे लागतात. खानदेश महामार्गामुळे हे अंतर ११८.२७० किमीवर येईल आणि हा प्रवास केवळ एका तासात करता येईल. या महामार्गाच्या संरेखनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.
मुंबई – जळगाव प्रवास केवळ पाच तासांत
खानदेश महामार्गाने जळगाव आता थेट समृद्धी महामार्गाशी जोडले जाणार आहे. त्यामुळे जळगाव – छत्रपती संभाजीनगर प्रवास एका तासात होणार आहे. तर दुसरीकडे मुंबई – जळगाव प्रवासही अतिजलद होणार आहे. आजघडीला या प्रवासासाठी किमान साडेसात ते आठ तास लागतात. पण खानदेश महामार्ग सेवेत दाखल झाल्यास मुंबई – जळगाव अंतर केवळ पाच तासांत कापता येणार आहे.
