मुंबई : वांद्रे येथे भर रस्त्यात स्टंटबाजी करणाऱया वाहनचालकांना अखेर खार पोलिसांनी ताब्यात घेतले. या स्टंटबाजीची चित्रफित समाजमाध्यमावर वायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. वांद्रे (प.) येथील कार्टर रोड कायम गजबजलेला असतो. या रस्त्यावर ७ जून रोजी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास एक वाहनचालक स्टंटबाजी करीत असल्याची चित्रफित समाजमाध्यमावर वायरल झाली होती.

एका पांढऱ्या रंगाच्या विद्युत वाहनानाच्या बोनेटवर एक इसम झोपलेला होता. ही गाडी भरधाव वेगान जात होती. याबाबत वांद्रे बझ या एक्स अकाऊंटवरून मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार खार पोलिसांनी मोटार वाहन अधिनियमाच्या कलम १८४, तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५, २८१ आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी याप्रकरणी शोध घेऊन दोन वाहनचालकांना ताब्यात घेतले.