‘खार’ म्हणजे खारट आणि ‘दांडा’ म्हणजे वाळुचे थर म्हणून खारदांडा असा ‘महिकावतीच्या बखरी’त उल्लेख असलेला खारदांडा हा कोळीवाडा. १५ ते १७ व्या शतकापासून अस्तित्त्वात असलेला हा कोळीवाडा. वांद्रे हे पुरातन काळापासून बंदर म्हणून परिचित होते. चिंबई आणि खारदांडा हे समुद्रकिनारी दोनच परिसर होते जेथे वस्ती होती. त्यातही चिंबई सखल भागात असल्यामुळे समुद्राचे पाणी थेट आत शिरायचे. तेथील बहुसंख्य वस्ती खारदांडात स्थलांतरित करण्यात आली. सुमारे १०० एकरवर पसरलेला उपनगरातील हा सर्वांत मोठा कोळीवाडा असावा, असेही सांगितले जाते. काही जुने जाणते कोळी बांधव सांगतात की, समुद्राचा काही भाग वर आला व तेथे वस्ती निर्माण करण्यात आली, त्यामुळेही त्याला खारदांडा नाव पडले. हा ‘मोठा दांडा’ व तर जुहू कोळीवाडा हा ‘बारका दांडा’ असे कोळी समाजात सर्रास म्हटले जाते. पोर्तुगीजांच्या काळात त्यांच्या खलाशांना मार्गदर्शक म्हणून ‘वराशी रीफ’ उभारण्यात आले. खारदांडा समुद्रात आज उभे असलेले दीपगृह तेच. आजही ते मच्छिमारांना दिशादर्शक म्हणून उपयोगी पडत आहे.
या कोळीवाड्याची एकूण लोकसंख्या किती याची माहिती उपलब्ध नसली तरी साडेचार हजार मच्छिमारांची सहकारी संस्थेत नोंद आढळते तर १३०० कोळी महिलांकडे मासेविक्रीचा महापालिकेचा अधिकृत परवाना आहे, यावरुन या कोळीवाड्याच्या भव्यतेची कल्पना यावी. या कोळीवाड्यालाही त्यांच्या सीमेलगत अतिक्रमणांनी घेरले आहे. त्यामुळे त्यांनाही आपल्यावर झोपु योजना लादली जाईल, अशी भीती वाटत आहे.

खार पश्चिम रेल्वे स्थानकावरुन बेस्ट बस वा शेअर रिक्षाने खारदांडा कोळीवाड्यात पोहोचता येते. वांद्रे पश्चिम येथून समुद्राला समांतर येणाऱ्या कार्टर रोडचे उत्तरेकडील टोक जेथे संपते तेथे खारदांडाचा चौक लागतो. डाव्या बाजुला समुद्राला समांतर पसरलेला अवाढव्य कोळीवाडा तर उजव्या बाजुला पुरातन दांडेश्वर शंकर मंदिर व त्यासमोर कोळी समाजाच्या हक्काची मासे सुकविण्याची जागा. त्यापैकी तीन ते चार हजार चौरस मीटर भूखंडावर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे काम सुरु आहे. कोळी समाजाची जागा यासाठी बळकावण्यात आली, असा आरोप आहे. आपली ही हक्काची जागा मिळावी यासाठी दांडा मासेमारी वाहतूक संघ (१९८०), दांडा कोळी समाज (२०१४), खारदांडा कोळीवाडा गावठाण संघ (२०२०) या कोळी बांधवांच्या तीन संघटना लढा देत आहेत. परंतु सरकारी यंत्रणांकडून दाद दिली जात नाही. या विरोधात ते उच्च न्यायालयात गेले तेव्हा उच्च न्यायालयाने समिती नेमली. समितीने दिलेल्या अहवालानंतर उच्च न्यायालयात त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने झोपु प्राधिकरण किंवा शहर दिवाणी न्यायालयात दाद मागण्यास सांगितले. तेथे न्याय न मिळाल्यास आमच्याकडे पुन्हा या, असे आदेश दिले आहेत. आम्ही शेवटपर्यंत आमच्या हक्काच्या जागेसाठी लढा देणार, असे खारदांडा कोळीवाडा गावठाण संघाचे सदस्य हितेश मखले यांनी सांगितले.

खारदांडा कोळीवाड्यात आजही दांडा पाडा, मधला पाडा, कोट पाडा, पाटील पाडा, वरिन पाडा, वेताळ पाडा असे पाडे आहेत. या प्रत्येक पाड्यात स्वतंत्र देवी आहे. पूर्वी आगरी पाडाही होता. परंतु आगरी समाजाबरोबर आमच्या पूर्वजांचे नीट जमले नाही. त्यामुळे तो पाडा खारदांडा कोळीवाड्याबाहेर राहिला. या कोळीवाड्याचेही २०१८ मध्ये सीमांकन झाले. परंतु मासे सुकविण्याची जागा, दांडेश्वर शंकर मंदिर, मरु आई मंदिर या आमच्या अनेक पुर्वपरपंरागत जागा या सीमांकनात घेतल्या गेल्या नाही, असा आरोपही मखले यांनी केला.

आमच्या धक्क्याखालून सुरुवातीला सागरी महामार्ग जाणार होता. परंतु आम्ही त्यास जोरदार विरोध केला. त्यानंतर सागरी सेतू बांधण्याचे निश्चित झाले. परंतु सागरी सेतुमुळे समुद्र किनाऱ्यावर होणारी मासेमारी आताच संपुष्टात आली आहे. पूर्वी किनाऱ्यावरही सूरमय, रावस आदी मोठे मासे मिळायचे. आता छोटे मासे मिळणेही मुश्किल झाले आहे. आमच्या लहान-मोठ्या साडेतीनशे बोटी आहेत. परंतु मासेमारीच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. पूर्वी तीन ते चार किलोमीटरवर डालदी (डोल नेट) टाकली तरी मोठे मासे सहज मिळायचे. आता ते संपले. शासन आम्हाला त्या मोबदल्यात म्हणे नुकसान भरपाई व आमच्या मुलांना नोकऱ्या देणार आहे. त्याने माशांचा दुष्काळ संपुष्टात येणार आहे का, असा सवाल दांडा कोळी समाजाचे अध्यक्ष दीपक बामे यांनी केले आहे.

सागरी सेतूपासून जे कनेक्टर आहेत ते सर्व कोळीवाड्यातच उतरविण्यात आले आहे. अन्यत्र जागा नाही का? कोळीवाड्यातून विरोध झाला तरी तो मोडून काढू, अशी सरकारची भावना असल्याची खंत खारदांडा कोळीवाडा गावठाण संघाचे खजिनदार पवन हालपे यांनी व्यक्त केली. परंतु आम्ही जुहू कोळीवाडा येथे होणारा कनेक्टर स्थलांतर करण्यात यश मिळवले. ॲड. गायत्री सिंग, जोरु बाथना यांच्यामुळे आमचा लढा यशस्वी होऊ शकला, असेही हालपे म्हणाले. सागरी सेतुमुळे आमच्या मूळ व्यवसायावरच गदा आली आहे. परंतु त्याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही, अशी कंतही त्यांनी बोलून दाखविली. कोळीवाड्यासाठी स्वतंत्र नियमावलीचा मसुदा अर्बर सेंटरचे संचालक पंकज जोशी यांच्या प्रयन्तांमुळे कोळीवाडा गावठाण समितीने सरकारकडे सादर केला आहे. त्याबाबत अद्याप निर्णय घेतला जात नाही. कोळीवाड्यांबाबत सरकार इतके उदासीन का, असा सवाल मखले यांनी विचारला आहे.

‘वारिन पाडा हवली’

‘होळी’ हा ब्रिटिश-भारतीय सरकारकडून अधिकृत मान्यता मिळालेला पहिला सार्वजनिक हिंदू सण मानला जातो; या सणाला १२ मार्च १९२२ रोजी मंजुरी देण्यात आली. त्यापूर्वी ‘खार दांडा’ येथील कोळी बांधव होळीच्या पारंपरिक उत्सवासाठी लागणारे लाकूड दरवर्षी वांद्रे परिसरातून गोळा करीत. मात्र, कालांतराने खार आणि वांद्रे भागात झाडांची कमतरता भासू लागल्याने आसपासच्या इतर गावांमध्ये जाण्यास कोळी बांधवांनी सुरुवात केली. एका प्रकरणात विहिरीतील पाटाचे लाकूड होळीसाठी चोरले गेल्यामुळे गावकीने आणि ब्रिटिशांचे तत्कालीन उपनगर जिल्हाधिकारी कार्टर पेरी सीनियर यांनी ‘दोन दिवस आधी होळी’ असा दंड ठोठावला. त्यांनी १२ मार्च १९२२ रोजी या सणाला अधिकृत मान्यता दिली. तेव्हापासून होळीचा सण मूळ तारखेच्या दोन दिवस आधी साजरा केला जातो.