मुंबई : शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५०व्या शहीदी शताब्दी वर्षानिमित्त नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या शहीदी शताब्दी समागमासाठी झालेल्या २७ कोटी ६४ लाख ९० हजार ६० रुपयांच्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. अल्पसंख्याक विकास विभागाने शुक्रवारी, ४ सप्टेंबर रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. शासनाने केलेल्या या खर्चा व्यतिरिक्त सिडकोने या धार्मिक कार्यक्रमावर लाखो रुपये खर्च केले होते.

खारघरमधील सेक्टर २९ येथील ओवे मैदानावर २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी ‘हिंद-की-चादर’ श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५०व्या शहीदी शताब्दी समागमाचे आयोजन करण्यात आले होते. गुरु तेगबहादूर यांचा गौरवशाली इतिहास, त्यांनी केलेला धर्मप्रचार तसेच मानवतेसाठी दिलेले बलिदान यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याच्या उद्देशाने राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या शताब्दी वर्षातील कार्यक्रम नागपूर, रायगड आणि नांदेड या तीन ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी तसेच त्यासंदर्भातील सांस्कृतिक कामांसाठी कांजूरमार्ग येथील संजीवनी ॲडडव्हर्टायझिंग कंपनीची कार्यक्रम व्यवस्थापन संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. संबंधित संस्थेला २७ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता.

खारघर येथील कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर त्यासाठी झालेल्या खर्चाचे देयक संबंधित कार्यक्रम व्यवस्थापन संस्थेला अदा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी २५ मार्च २०२६ रोजी याबाबतचे पत्र शासनाला पाठविले होते. त्यानंतर वित्त विभागाची मान्यताही घेण्यात आली.

शासन निर्णयानुसार, ‘सामाजिक सुरक्षा व कल्याण’ या लेखाशीर्षाखाली महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमीच्या विविध योजनांसाठी सहाय्यक अनुदानाच्या तरतुदीतून २७ कोटी ६४ लाख ९० हजार ६० रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा निधी संजीवनी ॲडडव्हर्टायझिंग कंपनीला कार्यक्रमासाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती म्हणून देण्यात येणार आहे.

या निधीच्या वितरणासाठी अल्पसंख्याक विकास विभागातील अधिकारी तथा अवर सचिव आणि नियंत्रक अधिकारी तथा उपसचिव यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. वित्त विभागाने २ सप्टेंबर रोजी दिलेल्या अनौपचारिक संदर्भातील मान्यतेच्या अधीन राहून हा शासन निर्णय काढण्यात आला आहे.

गुरु तेगबहादूर यांच्या ३५०व्या शहीदी शताब्दी वर्षानिमित्त राज्यातील विविध भागांत कार्यक्रम घेण्यात आले. खारघरमधील कार्यक्रम हा या उपक्रमातील महत्त्वाचा कार्यक्रम होता. आता त्यासाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने या कार्यक्रमावरील खर्चाला अधिकृत मंजुरी मिळाली आहे.