मुंबईकरांच्या वाहतुकीची कोंडी सोडविणारा वांद्रे खेरवाडी जंक्शन येथील उत्तरेकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वांद्रे-कुर्ला संकुलापासून पूर्व द्रुतगती मार्गावर जाणाऱ्या उन्नत मार्गाच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. मुंबईला जागतिक वित्तीय केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.
पश्चिम द्रुतगती महामार्गावरून दहिसरच्या दिशेने जाताना सर्वाधिक कोंडी वांद्रे येथील खेरवाडी जंक्शन येथे व्हायची. त्यासाठी एमएमआरडीएने उत्तरेकडे जाणारा उड्डाण पूल बांधला. ३२ कोटी रुपये किमतीचा हा उड्डाण पूल अवघ्या ६ महिन्यांत बांधून पूर्ण झाला. त्याचे उद्घाटन फडणवीस यांनी रविवारी सकाळी केले. यामुळे आता दहिसरकडे जाणारा २५ किलोमीटरचा मार्ग सिग्नलविरहित झालेला आहे. याशिवाय वरळी सीफेस कडेही सिग्नलरहित मार्गाने जाणे शक्य होणार आहे. हा उड्डाण पूल अवघ्या ६ महिन्यांत विक्रमी वेळेत बांधून पूर्ण करण्यात आल्याचे एमएमआरडीएचे आयुक्त मदान यांनी सांगितले.
 याशिवाय बीकेसी येथून थेट पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या उन्नत मार्गाचे भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. हे काम येत्या तीन वर्षांत पूर्ण केले जाणार आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर सिग्नलविरहित मार्गाने कसे जाता येईल त्याचे आराखडे मंजूर केले असून ते कामदेखील लवकर पूर्ण होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उड्डाण पुलाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करणारे एमएमआरडीएचे उपअभियंते अभिजित भिसीकर आणि कार्यकारी अभियंता यतीन साखळकर यांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला. कमी वेळेत काम करणाऱ्यांचा गौरव करा तर विलंब करणाऱ्यांना शिक्षाही करा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला आपल्या भाषणात केली.
 मोनोच्या बांधकामाबाबत कॅगने आपल्या अहवालात ताशेरे ओढले आहेत. त्याबद्दल माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, याबाबतचा अहवाल लोकलेखाकडे पाठवला आहे. त्यावर अजून सखोल चौकशी आवश्यक आहे. मात्र अहवालानंतर येणाऱ्या प्रकल्पात त्रुटी दूर केल्या जातील असेही ते म्हणाले. या कार्यक्रमास उद्योगमंत्री आणि पालकमंत्री सुभाष देसाई, महापौर स्नेहल आंबेकर, खासदार पूनम महाजन, राहुल शेवाळे, आमदार मंगेश कुडाळकर, तृप्ती सावंत आदी उपस्थित होते.

असा असेल बीकेसीचा नवा उन्नत मार्ग
सुमारे दीड किलोमीटर लांबी आणि १७.२ मीटर रुंदीचा हा मार्ग चार लेनचा असणार आहे. त्याला १५५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मिठी नदी, एलबीएस मार्ग, मध्य आणि दोनदा हार्बर रेल्वे ओलांडून तो जाणार आहे. यामुळे वांद्रेहून येताना धारावीची कोंडी लागणार नाही, तसेच पूर्व द्रुतगती मार्गावरून अवघ्या दीड मिनिटात बीकेसीमध्ये पोहोचणे शक्य होणार आहे. बीकेसीहून सुरू झालेला हा उन्नत मार्ग पूर्व द्रुतगती महामार्गाच्या एव्हरार्ड नगर येथे उतरणार आहे.