मुंबईच्या गर्दीत हरवलेल्या ‘कोळीवाडे.. गावठाणां’चा शोध घेत असताना फारच विदारक अनुभव येत आहेत. मुंबईतील ११८ गावठाणांमध्ये समावेश असलेल्या गिरगावातील ‘खोताची वाडी’ला भेट दिली तेव्हा तेथे मोजक्या संख्येने असलेल्या रहिवाशांच्या बोलण्यातून खेद प्रकर्षाने जाणवला. वारसा स्थळाचा बोजा किती काळ खांद्यावर वाहायचा? केवळ वारसा स्थळ नष्ट होत नाही तर त्याबरोबर जपलेली संस्कृती आणि परंपराही लयास जात आहे, याचा कधीतरी विचार होणार आहे का? त्यांना पडलेल्या या प्रश्नांनी निरुत्तर व्हायला होते.

सोळाव्या शतकात समुद्र किनारपट्टीवर ‘गावठाण’ म्हणून अनेक गावे वसली होती. मुंबई बेटांवर ब्रिटीशांची सत्ता येण्यापूर्वी ही किनारपट्टीजवळील गावे भरभराटीस आली होती. शहराचा विकास नुकताच कुठे सुरु झाला होता. परंतु त्याआधीपासून ‘खोताची वाडी’सारखी गावे अस्तित्वात होती. आजही हे गावठाण आपले अस्तित्त्व जपण्याचा प्रयत्न करीत आहे.

चर्नी रोड रेल्वे स्टेशनपासून पूर्वेला गेल्यावर दहा ते पंधरा मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर हे गावठाण आढळते. राजा राम मोहन रॅाय रोड, खाडिलकर रोड, जगन्नाथ शंकरशेठ रोड आणि वल्लभभाई पटेल रोड या चहुबाजुंनी वेढल्या गेलेल्या गिरगावातील जुन्या मार्गांनी ‘खोताची वाडी’ची सीमा निश्चित झाली आहे. १९९५ पासून, या परिसराला महानगरपालिकेच्या ‘मुंबई हेरिटेज कॉन्झर्व्हेशन कमिटी’ने ‘ग्रेड-३ वारसा स्थळ’ म्हणून घोषित केले आहे.

पोर्तुगीजांनी मुंबईत जी गावठाणे निर्माण केली त्यापैकी खोताची वाडी हे एक. मालाड, गोराई, मनोरी, वसई आदी ठिकाणी वास्तव्य असलेल्या रहिवाशांना शहरात व्यापारासाठी वा नोकरीसाठी येता यावे वा शहरातील मौजमजेचा आनंद लुटता यावा या हेतुने स्थापन झालेली ही गावठाणे. मुळात गिरगावातील पाठारे प्रभु ज्ञातीतील दादोबा वामन खोत (ब्रिटिशांच्या काळातील महसूल अधिकारी) यांच्या मालकीच्या भूखंडावर असल्याचे ‘खोताची वाडी’ हे नामाभिधान मिळाले. परंतु ते या वाडीचे एकमेव मालक नाही. त्यांनी हे भूखंड तुकड्या-तुकड्याने स्वतंत्रपणे विकले.

परेरा, बाप्टिस्टा आदी कुटुंबीयांनी ते विकत घेतले व आपली घरे बांधली. या वाडीतील जुने रहिवासी जेम्स फरेरा यांचे घर १८३२ मधील असल्याचे इतिहासकार आणि रहेजा स्कूल ॲाफ आर्किटेक्चर्समधील प्राध्यापक डॅा. ॲण्ड्र्यू बाप्टिस्टा सांगतात. बाप्टिस्टा हेही ‘खोताची वाडी’चेच रहिवासी. त्यांच्याही तीन-चार पिढ्या येथे लहानाच्या मोठ्या झालेल्या. त्यांचे मूळ घरही १८९० मधील असल्याचे पुरावेच त्यांच्याकडे आहेत. त्याकाळचा मंजूर आराखडाच त्यांनी दाखवला. ‘ही वाडी आहे. याला गावठाण म्हणता येणार नाही. परंतु पालिकेने आम्हाला गावठाणात ढकलून दिले आहे. हे वारसा स्थळ आहे’, असे बाप्टिस्टा आवर्जून नमूद करतात.

खोताची वाडीत आज काही मालकीची घरे तर काही पागडी पद्धतीची घरे आहेत. मूळ २५ घरेच आता शिल्लक राहिली आहेत. त्यातही मूळ रहिवाशी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आहेत. या वाडीत सुरुवातीला ६४ घरे होती, हे खोल्यांना दिलेल्या आकड्यांवरून कळते. त्यातच अ, ब, क, ड असे क्रमांक दिलेली घरेही आहेत. त्यामुळे मूळ घरेही ६४ पेक्षा जास्त होती, असे बाप्टिस्टा सांगतात.

वल्लभभाई पटेल रोडवरील दोन उत्तुंग इमारतीला खेटून असलेल्या छोट्या मार्गातून आत डावीकडे शिरल्यावर खोताची वाडी सुरु होते. खोताची वाडीला एकेकाळी ‘मुंबईतील ओल्ड गोवा’ किंवा ‘मिनी-पोर्तुगाल’ म्हटले जायचे. पोर्तुगीज शैलीतील घरे तसेच घरासमोर असलेले आकर्षक व्हरांडे आणि सजलेल्या बागांमुळे आजही या गल्ल्यांतून फेरफटका मारताना त्याची अनुभूती येते. पूर्वी समुद्र आणि आमच्यामध्ये नारळाच्या झाडांची भली मोठी रांग होती. जेव्हा ब्रिटिश आले आणि त्यांनी या भागाचा विकास करण्यास सुरुवात केली, तेव्हा गावाचा बाह्य परिसर नाहीसा झाला आणि आता तर ही वाडी गगनचुंबी इमारतींनी वेढली गेली आहे, असे परेरा सांगतात.

परेरा, बाप्टिस्टा यांची जुनी घरे आजही तेथे आहेत. या घरात त्यांच्या कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. हा वारसा व संस्कृती जपण्यासाठी राहत्या घरीच ईस्ट इंडियन पद्धतीचे भोजन पर्यटकांसाठी परेरा त्यांच्या राहत्या घरातच उपलब्ध करुन देतात. त्यांचे घर म्हणजे जुन्या वस्तुंचे संग्रहालय आहे. त्यांचे घर पाहिले की, त्या काळातील घरे आणि वस्तुंची माहिती होते.

परेराही आवर्जून ही सर्व माहिती देतात. त्यांच्या घरी काम करणारा पांडुरंग गावडे हा २० वर्षांपासून आहे. त्या काळातील गावाची नजाकत तो आजही सांगतो. ज्या कुटुंबांची मुळे या भागात शतकाहून अधिक काळापासून रुजलेली होती, त्या कुटुंबांमधील नव्या पिढ्या आता परदेशात स्थायिक झाल्या आहेत. त्यांना वारसा, संस्कृतीशी काही देणे-घेणे नाही. उरल्यासुरल्या घरांपैकी काही घरे आता पुनर्विकासात लाभ मिळविण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. आम्हाला ते नको आहे. परंतु वारसा स्थळ म्हणून आम्ही तरी किती दिवस हा बोजा वाहत बसायचा? महापालिकेने ग्रेड तीनमध्ये स्थान दिल्यामुळे दुरुस्ती वा पुनर्बांधणी ही समस्या नाही. परंतु प्रत्येक दिवशी एक नवे आवाहन निर्माण होत आहे. ते कसे झेलायचे असा आम्हाला प्रश्न पडलाय, असे बाप्टिस्टा सांगतात.

‘मुंबईच्या मध्यभागी स्थित वारसा ठिकाण असलेले ईस्ट इंडियन गावठाण’ म्हणजे ‘खोताची वाडी’ असं महापालिकेने आपल्या संकेतस्थळावर ‘मुंबई लेगसी प्रोजेक्ट’ म्हणून उल्लेख केला आहे. माझगावातील म्हातारपाखडी याच पठडीतले. (याचं स्तंभात सविस्तर लिहिले आहे) या मंडळींनी पदरमोड करुन वारसा, संस्कृती, परंपरा जपण्याचा काटेकोर प्रयत्न केला आहे. परंतु गगनचुंबी इमारतींच्या गर्दीत पार चेपल्या गेलेल्या या वारसा परिसराची चाड प्रशासनाला आहे, असे अजिबात जाणवत नाही. तीच त्यांची खंत आहे. मुंबईकरांना ही वाडी लुप्त होण्याआधी एकदा तरी या ठिकाणी फेरफटका मारावा आणि जुनी गावठाणे कशी होती, याचा अनुभव घ्यावा.

मुंबईचे लुप्त झालेले सौदर्य …

खोताच्या वाडीतील वळणावळणात, गल्ल्यांमध्ये वसलेले बंगले हे तत्कालीन गृह-स्थापत्यशैलीचे दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे. अगदी भरभरुन पाहावे असे. जुन्या आठवणींना उजाळा देताना जुने नागरिक जेम्स फरेरा म्हणतात : मला आठवते की, दर संध्याकाळी गॅसचे दिवे लावले जायचे. पारंपरिक वेशभूषेतील चिनी विक्रेते भरतकाम केलेले कपडे, तसेच टेबल आणि बेडसाठीचे कापड (लिनन) विकायला यायचे. नन्स (धर्मभगिनी) लेस आणि हाताने बनवलेल्या विविध सुंदर वस्तू घराच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन यायच्या. मला एका वेगळ्याच, मोहक मुंबईची आठवण येते. गणपती उत्सवाची सुरुवात व्हायची तेव्हा गणपतीची मूर्ती एका छोट्या हातगाडीवरून नेली जायची, महिला भजन-कीर्तन करीत गणरायाचे स्वागत करायच्या तेव्हा वाडीत मोगऱ्याचा सुगंध दरवळायचा. मला अशा मुंबईची आठवण येते की, जी खरोखरच सुंदर होती…