दोन लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या रिक्षाचालकाच्या सहा वर्षे वयाच्या मुलाची घाटकोपर पोलिसांनी मंगळवारी अवघ्या दोन तासांत सुटका केली. मुलाचे अपहरण करून त्याला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या उमेश भागवत (३२) याला पोलिसांनी अटक केली  त्याच्याकडे शस्त्र सापडले असून त्याबाबत तो काहीही सांगत नसल्याचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट पाटील यांनी सांगितले. घाटकोपर पश्चिमेला राहणाऱ्या मुलाला उमेशने  चॉकलेटचे आमिष दाखवून पळवले. या काळात त्याने मुलाकडून वडिलांचा मोबाइल क्रमांक मिळविला. मोबाइलवर  फोन करून मुलाच्या सुटकेसाठी दोन लाखांची खंडणी मागितली. त्यामुळे घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली.  सव्वा दहाच्या सुमारास विद्याविहार रेल्वे स्थानकावर खंडणीची रक्कम घेऊन येण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून उमेशला अटक केली. वरिष्ठ निरीक्षक व्यंकट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक याकुब मुल्ला, चंद्रकांत तेंडुलकर, योगेश देशमुख आदींनी ही कारवाई केली.