कुख्यात गुंड रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या याला ठार करून आम्ही काहीही चूक केलेली नाही. अशा गुंडांना यमसदनी पाठविले नाही तर सर्वसामान्यांना रस्त्यातून निर्भयपणे फिरणेही अशक्य होईल. या गुन्ह्यासाठी आपल्याविरुद्ध पुरेसा पुरावा असेल तर त्यासाठी फासावर चढण्याचीही आपली तयारी आहे, अशा शब्दांत या प्रकरणातील दोन दोषी पोलिसांनी मंगळवारी सत्र न्यायालयासमोर आपल्या कृत्याचे समर्थन केले. मात्र खटल्याचा निकाल तोंडावर आला असतानाच असे वक्तव्य करून  स्वतची प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न हे दोषी पोलीस करीत असल्याचे बोलले जाते.
लखनभैय्याच्या बनावट चकमकीवर शिक्कामोर्तब करीत सत्र न्यायालयाने निलंबित पोलीस अधिकारी प्रदीप सूर्यवंशी आणि १२ पोलिसांसह एकूण २० जणांना दोषी ठरविले आहे.  सूर्यवंशीसह १२ पोलिसांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सोमवारी सरकारतर्फे करण्यात आली.
मंगळवारी न्यायालयाने आरोपींचे शिक्षेबाबतचे म्हणणे ऐकून घेतले. त्या वेळेस लखनभैय्याला ठार करून आपण काही चूक केलेली नाही, अशा शब्दांत दोषी पोलिसांनी आपल्या कृत्याचे समर्थन केले. लखनभैय्यासारख्या गुंडांना ठार केले गेले नाही, तर लोकांचे रस्त्यावर फिरणे मुश्किल होईल. असे गुंड नसल्यामुळेच सध्या लोक कुठल्याही भीतीशिवाय रस्त्यावरू फिरू शकतात, असे एक दोषी हवालदार रत्नाकर कांबळे याने न्यायालयाला सांगितले.
लखनभैय्याच्या बनावट चकमकीचे नेतृत्व करणारे निलंबित पोलीस अधिकारी प्रदीप सूर्यवंशी यांनी न्यायालयाला सांगितले की, स्व:रक्षणासाठी आपण गोळीबार केला. समोरून गोळीबार होत असल्यास प्रतिकार करण्याशिवाय कुठलाही पर्याय पोलिसांकडे राहत नाही. जर आम्हाला स्व:रक्षणाचा अधिकार नसेल, तर आम्ही काय करायचे? पोलीस आयुक्तांना फोन करून काय करावे हे विचारायचे का, असा सवाल करीत यामुळे पोलिसांचे मनोधैर्यच खच्ची होईल, असाही दावा सूर्यवंशी यांनी केला. जर आपल्याविरुद्ध पुरेसे पुरावे असतील, तर आपण फासावर चढायला तयार असल्याचेही सूर्यवंशी यांनी न्यायालयाला सांगितले. त्याचप्रमाणे पोलिसांनी बरेचसे पुरावे न्यायालयासमोर सादर केले नाहीत. त्यांनी जर ते सादर केले असते तर आम्ही आमचा बचाव केला असता, असाही दावा सूर्यवंशी यांनी केला.
काही पोलिसांनी मात्र कुटुंबियांचा हवाला देत दयेसाठी आर्जव केले. तर काहींनी आपण व्यवस्थेचा बळी ठरल्याचे सांगितले. काहींनी आपण केवळ वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केल्याचे म्हटले, तर काहींनी सेवेत असताना आपल्यावर अन्य कुठलाही ठपका नसल्याचा दावा केला.
लखनभैय्यासारख्या गुंडांना ठार केले गेले नाही, तर लोकांचे रस्त्यावर फिरणे मुश्किल होईल. असे गुंड नसल्यामुळेच सध्या लोक कुठल्याही भीतीशिवाय रस्त्यावरू फिरू शकतात, असे एक दोषी हवालदार रत्नाकर कांबळे याने न्यायालयाला सांगितले.